सेल्फीचा मोह जीवावर बेतला; तस्कर हत्तीच्या हल्ल्यात युवकाचा दुर्दैवी मृत्यू
हत्तीच्या अगदी जवळ जाण्याचा अट्टहास ठरला घातक; वन विभागाचे नागरिकांना पुन्हा सावध राहण्याचे आवाहन...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मोबाईलवर एक सेल्फी टिपण्याचा मोह एका युवकाच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना गडचिरोली शहरालगतच्या चांदळा जंगल परिसरात घडली. परिसरात वावरणाऱ्या तस्कर हत्तीच्या अगदी जवळ जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असताना हत्तीने अचानक हल्ला चढविल्याने धनराज पुंजीराम मडावी (रा. मेंढा, चांदळा) यांचा जागीच मृत्यू झाला. अनेक नागरिकांच्या समोर ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे आणि हळहळीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, तस्कर हत्ती चांदळा जंगल परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच अनेक नागरिक त्याला पाहण्यासाठी आणि मोबाईलवर छायाचित्रे तसेच सेल्फी घेण्यासाठी घटनास्थळी जमा झाले होते. याचवेळी धनराज मडावी यांनी हत्तीच्या अत्यंत जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मानवी हालचालींची चाहूल लागताच हत्तीने आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात धनराज मडावी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, या घटनेने वन्यजीवांबाबत निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो, याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे. वन विभागाकडून रानटी हत्ती किंवा इतर वन्यप्राण्यांच्या जवळ न जाण्याच्या, सुरक्षित अंतर राखण्याच्या आणि सेल्फी किंवा व्हिडीओच्या मोहापासून दूर राहण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात असतानाही काही नागरिक त्या दुर्लक्षित करीत असल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सध्या हत्तींचा वावर वाढलेला असून मानवी वस्त्यांच्या जवळ त्यांच्या हालचाली वारंवार दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत केवळ कुतूहलापोटी किंवा सोशल मीडियासाठी जीव धोक्यात घालणे घातक ठरू शकते. वन्यप्राणी हे नैसर्गिक अधिवासातील संवेदनशील आणि अनिश्चित वर्तन करणारे प्राणी असल्याने त्यांच्या हालचालींचा अंदाज बांधणे अशक्य असते.
या पार्श्वभूमीवर वन विभागाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, हत्ती अथवा इतर वन्यप्राणी दिसल्यास त्यांच्या जवळ जाण्याचा किंवा त्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करू नये तसेच तातडीने वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.

