Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिथे औषधही पोहोचत नव्हते, त्या नारगुंडाने घडवला पहिला डॉक्टर!

नक्षलग्रस्त आदिवासी बहुल नारगुंडाच्या आदिवासी युवकाची अभूतपूर्व भरारी; प्रतिकूलतेवर मात करत एमबीबीएस पूर्ण..

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : ज्या भागाची ओळख अनेक वर्षे नक्षलवाद, आदिवासी बहुल, दुर्गम आणि विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या गावांमुळे होत आली, त्या भामरागड तालुक्याने आता अभिमानाने सांगण्यासारखी नवी ओळख मिळवली आहे. जंगलाच्या कुशीत वसलेल्या नारगुंडा या छोट्याशा आदिवासी गावातील एका तरुणाने संघर्ष, जिद्द आणि शिक्षणाच्या बळावर अशी भरारी घेतली आहे की आज संपूर्ण गडचिरोली त्याच्या यशाचे कौतुक करत आहे.

नारगुंडा गावचा सुरज विष्णू पुंगाटी याने सोलापूर येथील डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची अंतिम परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करत इतिहास घडविला आहे. गावातून डॉक्टर होणारा तो पहिलाच युवक ठरला असून त्याच्या यशाने केवळ कुटुंबाचे नव्हे, तर संपूर्ण भामरागड तालुक्याचे स्वप्न साकार झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सुरजच्या वाट्याला लहानपणापासूनच संघर्ष आला. गावात मर्यादित सुविधा, आर्थिक अडचणी आणि शिक्षणासाठी करावी लागणारी धडपड या सर्व अडथळ्यांवर मात करत त्याने शिक्षणाची वाट धरली. हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या शाळेतून त्याच्या शिक्षणाचा पाया रचला गेला. त्यानंतर नागपूरमध्ये शिक्षण घेत असताना डॉक्टर होण्याचे स्वप्न अधिक दृढ झाले.

मात्र डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण करणे यात मोठा फरक असतो. नीट परीक्षेच्या तयारीसाठी लागणारा खर्च त्याच्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होता. अशावेळी पुण्यातील ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ या संस्थेच्या ‘उलगुलान’ प्रकल्पाने त्याला आधार दिला. मोफत निवासी प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण शैक्षणिक मदतीमुळे त्याचा आत्मविश्वास वाढत गेला आणि त्याने वैद्यकीय शिक्षणाची दारे उघडली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आज एमबीबीएसची पदवी हातात घेतलेल्या सुरजचे स्वप्न मात्र इथे संपत नाही. ज्या मातीतून तो घडला, ज्या भागात आजही आरोग्य सुविधांचा अभाव आहे, त्या आदिवासी बांधवांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेण्याचा त्याचा निर्धार आहे.

दुर्गम भागातील लोकांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, हे मी जवळून पाहिले आहे. डॉक्टर म्हणून माझे ज्ञान आणि शिक्षण माझ्या समाजासाठी उपयोगी पडावे, हीच माझी इच्छा आहे, असे सुरज सांगतो.

गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात डॉक्टरांची कमतरता, कुपोषण आणि आरोग्यसेवेच्या समस्या अजूनही गंभीर आहेत. अशा वेळी स्थानिक संस्कृती, भाषा आणि लोकजीवन समजणारा डॉक्टर तयार होणे ही केवळ एका विद्यार्थ्याची उपलब्धी नाही, तर संपूर्ण समाजासाठी आशेची नवी पहाट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.