४८.६२ लाखांची अपसंपदा; कुरखेड्याच्या अव्वल कारकुनाला ACBचा दणका!
पत्नीही आरोपी; उत्पन्नाच्या तुलनेत बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचा ACBचा दावा...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुरखेडा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तत्कालीन अव्वल कारकून नागसेन प्रेमदास वैद्य यांच्या मालमत्तेची चौकशी करताना त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा तब्बल ४८ लाख ६२ हजार ७११ रुपयांची अधिक मालमत्ता आढळून आल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला आहे. या प्रकरणी वैद्य यांच्यासह त्यांच्या पत्नी रजनी नागसेन वैद्य यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ACBच्या माहितीनुसार, नागसेन वैद्य हे कुरखेडा उपविभागीय अधिकारी कार्यालयात अव्वल कारकून (वर्ग-३) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या तसेच पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्ता आणि ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत उत्पन्नाच्या तुलनेत ४८ लाख ६२ हजार ७११ रुपयांची अपसंपदा आढळून आल्याचे ACBने नमूद केले आहे.
१ ऑगस्ट २०२३ ते ५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान ही बाब समोर आल्याचे विभागाने म्हटले आहे. संबंधित मालमत्तेबाबत वैद्य दाम्पत्याकडून समाधानकारक खुलासा न झाल्याने ACBकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपसंपत्तीचा स्रोत, मालमत्ता व संबंधित आर्थिक व्यवहारांचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
कारवाईतील प्रमुख मुद्दे
आरोपी : नागसेन प्रेमदास वैद्य व रजनी नागसेन वैद्य
तत्कालीन पद : अव्वल कारकून, कुरखेडा
अपसंपदा : ४८ लाख ६२ हजार ७११ रुपये
गुन्हा : भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये
तपास : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली.

