Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

टीईटी परीक्षेला अचानक ‘ब्रेक’; प्रश्नपत्रिका फुटीच्या संशयाने परीक्षा पुढे ढकलली

भिवंडीतील कारवाईनंतर परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय; पारदर्शकतेसाठी नव्या तारखेची प्रतीक्षा...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : राज्यातील शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रविवारी, २८ जून २०२६ रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

राज्यातील तब्बल १ हजार २८ परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेची तयारी पूर्ण झाली असतानाच, परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेच्या दृष्टीने परीक्षा परिषदेला हा निर्णय घ्यावा लागला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भिवंडीतील संशयाने वाढवली चिंता..

२७ जूनच्या पहाटे परीक्षा परिषदेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भिवंडी परिसरात काही व्यक्तींकडे टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई करत तपास सुरू केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. पडताळणीदरम्यान संबंधित व्यक्तींकडे आढळलेल्या काही प्रश्नांचा आणि जून २०२६ च्या टीईटी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा साम्य आढळून आल्याचे समोर आले.याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

उमेदवारांच्या हितासाठी परीक्षा स्थगित..

परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष, सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नियोजित टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.परीक्षेची नवीन तारीख, वेळ आणि इतर आवश्यक सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहेत. हजारो उमेदवारांची नजर आता नव्या तारखेकडे; प्रश्नपत्रिका सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.