अहेरी महिला-बाल रुग्णालयातील आरोग्यसेवेचा प्रश्न विधानभवनात; जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यपद्धतीच्या चौकशीची मागणी
भाजप पदाधिकारी व नगरसेवकांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची घेतली भेट; डॉक्टरांची तातडीने नियुक्ती व रिक्त पदभरतीला गती देण्याची मागणी...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयातील आरोग्यसेवेच्या प्रश्नाने आता थेट विधानभवन गाठले आहे. रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यपद्धतीची उच्चस्तरीय चौकशी, आवश्यक असल्यास त्यांची बदली, तसेच अहेरी रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरून पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार तसेच नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, विकास उईके, मुकेश नामेवार आणि संजय पोहणेकर यांनी आरोग्यमंत्र्यांसमोर अहेरी महिला व बाल रुग्णालयातील सद्यस्थिती मांडली. निवेदनात, रुग्णालयातील डॉक्टरांच्या राजीनाम्यांमुळे आरोग्यसेवेवर परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यपद्धतीबाबत स्थानिक स्तरावर नाराजी व्यक्त होत असल्याचेही त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
शिष्टमंडळाने प्रतिनियुक्तीवर डॉक्टर उपलब्ध करून दिल्यानंतरही स्थानिक स्तरावर येणाऱ्या प्रशासकीय व कार्यात्मक अडचणींची माहिती आरोग्यमंत्र्यांना दिली. अहेरीसारख्या दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना अखंड आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी कायमस्वरूपी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती, रिक्त पदांची तातडीने भरती आणि प्रशासनात समन्वय वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित बाबींची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात येतील, तसेच अहेरी महिला व बाल रुग्णालयात आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली.
अहेरी उपविभागासह परिसरातील हजारो महिला व बालकांसाठी हे रुग्णालय महत्त्वाचे आरोग्य केंद्र मानले जाते. त्यामुळे रिक्त पदे भरून आरोग्यसेवा पूर्ववत करणे आणि प्रशासकीय अडचणी दूर करणे ही स्थानिक नागरिकांचीही प्रमुख अपेक्षा बनली आहे. आरोग्यमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेनंतर अहेरीतील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पुढील प्रशासकीय निर्णयांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
*‘पदवी ते रोजगार’ प्रवासाला PM-NAPS ची दिशा; गोंडवाना विद्यापीठात उद्योग-विद्यार्थी संवाद..*
‘पदवी ते रोजगार’ प्रवासाला PM-NAPS ची दिशा; गोंडवाना विद्यापीठात उद्योग-विद्यार्थी संवाद

