Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जि.प. भरतीचा मार्ग मोकळा; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोलीच्या गट-क आणि गट-ड संवर्गातील पदभरतीची प्रतीक्षा करणाऱ्या अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विविध संवर्गांतील पदांसाठी पात्र ठरलेल्या १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जिल्हा परिषद प्रशासनाने जाहीर केली आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांच्या पुढील प्रक्रियेला आता वेग येण्याची शक्यता आहे.

शैक्षणिक अर्हता आणि सामाजिक प्रवर्गाच्या निकषांनुसार राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण झालेल्या अनुक्रम प्रकरणांची प्रशासनाने तपासणी केली. उपलब्ध कागदपत्रे आणि पूर्ण माहितीच्या आधारे १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची तयार करण्यात आली असून ती जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळासह जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या यादीमुळे संबंधित उमेदवारांना आपल्या नावाची आणि प्रतीक्षा यादीतील स्थितीची अधिकृत माहिती मिळणार आहे. पुढील पदस्थापना अथवा समुपदेशनाची प्रक्रिया शैक्षणिक पात्रता, सामाजिक प्रवर्ग आणि उपलब्ध पदांनुसार केली जाणार असल्याने उमेदवारांनी केवळ अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, प्रतीक्षा यादी जाहीर झाल्यानंतर नोकरीच्या आमिषाने आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने उमेदवारांना विशेष सावधानतेचा इशारा दिला आहे. ‘पैसे द्या, नोकरी लावून देतो’ किंवा पदस्थापना मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भरती प्रक्रियेत कोणत्याही व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास अथवा नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यास संबंधित उमेदवारांनी तत्काळ जिल्हा परिषद प्रशासनाशी संपर्क साधावा. यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अनिकेत पाटील यांच्याशी ९७६७५०१५३० या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

जिल्हा परिषद प्रशासनाने भरती प्रक्रियेतील पारदर्शकता कायम ठेवण्यावर भर दिला असून उमेदवारांनी अनधिकृत व्यक्ती, मध्यस्थ किंवा अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि सूचना फलकांवर प्रसिद्ध होणाऱ्या माहितीलाच अंतिम मानावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.