Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वीजप्रश्नांवर डॉ. प्रणय खुणे आक्रमक; शेतकऱ्यांच्या न्यायासाठी थेट अधीक्षक अभियंत्यांच्या दारी

सक्तीचे स्मार्ट मीटर, शेतीपंपांचे भारनियमन आणि अवाजवी वीजबिलांविरोधात आवाज; प्रश्न न सुटल्यास गावोगावी जनआंदोलनाचा इशारा.

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली | प्रतिनिधी

सामाजिक प्रश्नांची नेमकी नस पकडत सर्वसामान्यांच्या अडचणींना वाचा फोडणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रणय खुणे यांनी आता जिल्ह्यातील वीजसमस्यांचा मुद्दा हाती घेतला आहे. शेतीपंपांचे भारनियमन, सक्तीचे स्मार्ट मीटर, अवाजवी वीजबिले आणि विद्युत दंडाच्या वसुलीमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून थेट वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक दिली. गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी अधीक्षक अभियंता खांडेकर यांना निवेदन देत वीजव्यवस्थेतील त्रुटींवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात रोजगाराच्या मर्यादित संधी, शेतीवरील अवलंबित्व आणि सामान्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता वाढीव वीजबिलांचा प्रश्न केवळ तांत्रिक राहत नाही; तो थेट उपजीविकेशी जोडला जातो. शेतीपंपांचे भारनियमन शेतीच्या कामांवर परिणाम घडवते, तर स्मार्ट मीटर, बिलांतील अनियमितता आणि दंडाच्या वसुलीबाबतच्या तक्रारी नागरिकांच्या अडचणी वाढवत असल्याचे संघटनेने निवेदनातून निदर्शनास आणले.

प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष महेश विश्वास, संदीप भोवरे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या वेळी वीजग्राहकांच्या समस्या मांडल्या. शेतीपंपांचे भारनियमन बंद करणे, सक्तीच्या स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करणे, अवाजवी वीजबिले रोखणे आणि नागरिकांकडून जबरदस्तीने विद्युत दंड वसूल न करणे, या प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रश्न गावागावांत पोहोचवण्याचा इशारा

वीजसमस्यांबाबत केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष दिलासा मिळावा, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावागावांत व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. त्यामुळे वीजग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण आणि प्रशासनाच्या प्रतिसादाकडे आता लक्ष लागले आहे.

दरम्यान, वीजबिलांसह विद्युत वितरणासंबंधी तक्रारी सोडविण्यासाठी १९ ऑक्टोबर रोजी घोट येथे समस्या निवारण शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता खांडेकर यांनी सांगितले. या शिबिरातून नागरिकांच्या तक्रारींचे प्रत्यक्ष निराकरण कितपत होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण वीजग्राहकांना अपेक्षित असलेला दिलासा हा केवळ आश्वासनांतून नव्हे, तर समस्यांच्या प्रभावी निवारणातूनच मिळू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.