विद्यार्थिनीला धमकावून लैंगिक अत्याचार; शिक्षकाला ५ वर्षांची शिक्षा
अहेरी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीवर ७० हजारांचा दंड...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विद्यार्थिनीला संरक्षण आणि शिक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात अहेरी न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. भामरागड तालुक्यातील कुकामेटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक रवींद्र उद्घजी गडारे (४६) याला अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच ७० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.
अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्यानंतर हा प्रकार कुणाला सांगितल्यास मारहाण करण्याची आणि शाळेतून काढून टाकण्याची धमकी आरोपीने दिल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे या प्रकरणात लाहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने विविध पुरावे न्यायालयासमोर सादर केले. पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी शिक्षकाला दोषी ठरवत पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
सरकारतर्फे अॅड. अरुण मसराम यांनी बाजू मांडली. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सहकार्य केले.

