अहेरीच्या क्रीडा मार्गदर्शकाचा जागतिक मंचावर डंका; हाँगकाँग येथील मानाच्या ‘वर्ल्ड ब्रुस ली एक्सलन्स अवॉर्ड’ पुरस्कारावर कोरले नाव
गडचिरोलीच्या क्रीडावैभवात मानाचा तुरा रोवल्याने प्रशासनातर्फे भव्य सत्कार..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी(गडचिरोली) : दुर्गम व आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा सुवर्णतुरा रोवला गेला असून, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत क्रीडा मार्गदर्शक तथा सहाय्यक प्रकल्प क्रीडा समन्वयक म्हणून अविरत सेवा देणारे डॉ. सेन्साई रवी भाऊराव भांदककर यांनी थेट जागतिक पातळीवर जिल्ह्याचा डंका वाजवला आहे. मार्शल आर्ट्स क्षेत्रातील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘वर्ल्ड ब्रुस ली एक्सलन्स अवॉर्ड’ (Bruce Lee Excellence Award) तसेच हाँगकाँग (चीन) येथे रंगणाऱ्या प्रतिष्ठित ‘जागतिक मास्टर्स क्रीडा स्पर्धे’साठी त्यांची निवड झाली आहे. या अद्वितीय आणि ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय यशाबद्दल अहेरी प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांचा भव्य नागरी सत्कार करून त्यांना हाँगकाँग दौऱ्यासाठी प्रशासनातर्फे भावपूर्ण शुभेच्छा देण्यात आले .
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, खमनचेरू येथे आगामी २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान पार पडणाऱ्या प्रकल्पस्तरीय क्रीडा महोत्सवाच्या नियोजन बैठकीचे औचित्य साधून या विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अहेरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांच्या वतीने सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) धनराज डबले यांच्या हस्ते डॉ. सेन्साई रवी भांदककर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष बाब म्हणून गौरव करण्यात आला. या महत्त्वपूर्ण प्रसंगी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या तब्बल २७ आश्रमशाळांमधील मुख्याध्यापक, क्रीडा मार्गदर्शक आणि क्रीडा शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्याच सहकाऱ्याने जागतिक मंचावर मारलेली ही गरुडझेप पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात भांदककर यांचे कौतुक केले.
हाँगकाँग येथे २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२६ या कालावधीत जागतिक मास्टर्स क्रीडा स्पर्धा व भव्य आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा संपूर्ण राष्ट्रीय चमू २५ नोव्हेंबर रोजी राजधानी नवी दिल्ली येथून हाँगकाँगसाठी विमानाने रवाना होणार आहे. या आंतरराष्ट्रीय मोहिमेकरिता डॉ. रवी भांदककर हे २४ नोव्हेंबर रोजी अहेरीतून दिल्लीकडे प्रयाण करतील.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, जंगलांनी वेढलेला परिसर आणि सुविधांची वानवा असतानाही अहेरीसारख्या सीमावर्ती भागातील आदिवासी पाड्यांमधील विद्यार्थ्यांना मार्शल आर्ट्स व विविध खेळांचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय स्तरावर घडवण्यात सेन्साई रवी भांदककर यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. एका निष्ठावंत क्रीडा मार्गदर्शकाची थेट आंतरराष्ट्रीय ब्रुस ली पुरस्कारासाठी झालेली निवड ही केवळ अहेरी प्रकल्पासाठीच नव्हे, तर संपूर्ण आदिवासी विकास विभाग, गडचिरोली जिल्हा आणि क्रीडाप्रेमींसाठी अतीव अभिमानास्पद ठरली असून त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा प्रचंड वर्षाव होत आहे..

