Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नवजात बालकांच्या देखभालीसोबत नियमित पुनर्तपासणीवर भर

जिल्हा महिला व बाल रुग्णालयात राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहानिमित्त मार्गदर्शन...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : अकाली जन्मलेली, जन्मतः कमी वजनाची तसेच आजारी नवजात बालके ही विशेष काळजीची गरज असलेली असतात. अशा बालकांची रुग्णालयात योग्य देखभाल करण्यासोबतच घरी गेल्यानंतर त्यांच्या आरोग्याची नियमित वैद्यकीय पुनर्तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मार्गदर्शन राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहानिमित्त जिल्हा महिला व बाल रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांच्या हस्ते झाले. १५ ते २१ नोव्हेंबरदरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताहाची यंदाची संकल्पना ‘लहान बाळे, मोठी क्षमता; त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पाठपुरावा सेवेत गुंतवणूक करा’ अशी आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. माधुरी किलनाके यांनी किशोरवयापासूनच मुलींच्या आरोग्य व पोषणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर मातेला सकस आहार मिळणे, नवजात बालकाची योग्य काळजी घेणे, बालकाला केवळ स्तनपान देणे तसेच माता व बालकाच्या आरोग्याची काळजी घेण्यात कुटुंबाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

जन्मानंतरचे पहिले २८ दिवस नवजात बालकासाठी अत्यंत संवेदनशील असतात. या काळात बालकाच्या प्रकृतीतील बदलांकडे पालकांनी बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. धोक्याची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेणे, गरजेनुसार पुढील उपचारांसाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून घेणे आणि रुग्णालयातून घरी गेल्यानंतर बालकाच्या आरोग्य – -स्थितीनुसार नियमित पुनर्तपासणी करणे आवश्यक असल्याचे वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय करपते यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

थंडीच्या दिवसांत नवजात व आजारी बालकांना योग्य उब मिळेल याची काळजी घेणे, वेळापत्रकानुसार लसीकरण पूर्ण करणे तसेच जन्मजात दोष असलेल्या बालकांसाठी जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रामार्फत (DEIC) उपलब्ध सेवांचा लाभ घेण्याबाबतही यावेळी माहिती देण्यात आली. उपस्थित पालक व नातेवाईकांना विषयाची माहिती सहज समजावी यासाठी दृकश्राव्य आणि माहितीपर साहित्याचा वापर करण्यात आला.

कार्यक्रमाला डॉ. नीलकंठ मसराम, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कन्नमवार, सहाय्यक अधिसेविका कविता पोतराजवार यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, परिचर्या प्रशिक्षणार्थी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रतिज्ञा रामटेके यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.