Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वैदूंच्या मौखिक ज्ञानपरंपरेला मिळणार साहित्यिक व्यासपीठ

देसाईगंज येथे २८ व २९ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय ‘पारंपरिक वैदू साहित्य संमेलन’...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

देसाईगंज (गडचिरोली) : जंगल, वनौषधी, निसर्ग आणि लोकपरंपरेशी घट्ट नाते सांगणाऱ्या वैदू समाजाच्या समृद्ध ज्ञानपरंपरेला साहित्यिक व संशोधनात्मक व्यासपीठ मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून, आरोग्य प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने २८ व २९ नोव्हेंबर रोजी देसाईगंज येथे गडचिरोली जिल्हास्तरीय ‘पारंपरिक वैदू साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे.

हटवार मंगल कार्यालय, लाखांदूर रोड, कस्तुरबा वॉर्ड येथे होणाऱ्या या संमेलनात वैदू समाजाच्या मौखिक साहित्यापासून लोककथा, दंतकथा, आख्यायिका, पारंपरिक आरोग्यज्ञान, वनौषधी आणि निसर्गाशी जोडलेल्या लोकज्ञानापर्यंत विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे. लोप पावत चाललेल्या या ज्ञानपरंपरेचे संकलन, दस्तऐवजीकरण आणि पुढील पिढीकडे हस्तांतरण हा संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ग्रंथदिंडी, वृक्षदिंडीने प्रारंभ…

शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता श्री लक्ष्मीनारायण मंदिरापासून हटवार मंगल कार्यालयापर्यंत ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी काढण्यात येईल. सकाळी ९ वाजता वृक्ष-ग्रंथ प्रदर्शनी, वनौषधी स्टॉल व नोंदणीचा प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप ढवळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

संमेलनाध्यक्ष म्हणून पारंपरिक वैदू व वन्यजीव अभ्यासक मिलिंद उमरे, तर स्वागताध्यक्ष म्हणून भाग्यवान खोब्रागडे राहणार आहेत.

लोकज्ञानापासून दस्तऐवजीकरणापर्यंत चर्चा…

संमेलनात ‘वैदू समाजाचे लोकज्ञान : मौखिक परंपरेपासून लिखित साहित्यापर्यंत’, ‘लोकसाहित्य : लोककथा, दंतकथा आणि आख्यायिका’, ‘वैदू समाजाचा मौखिक इतिहास : संशोधन आणि दस्तऐवजीकरण’ तसेच ‘वनस्पती, निसर्ग आणि वैदूंचे पारंपरिक ज्ञान’ या विषयांवर परिसंवाद व परिचर्चा होणार आहेत.

डॉ. सविता सादमवार, डॉ. नरेंद्र आरेकर, डॉ. हेमराज निखाडे, प्रा. डॉ. धनराज खानोरकर यांच्यासह विविध अभ्यासक व साहित्यिक विचार मांडतील. ‘वैदूंचे खुले सत्र’, सांस्कृतिक कार्यक्रम आणि काव्यवाचनही आयोजित करण्यात आले आहे.

रविवारी जैवविविधता उद्यान भेट, साहित्य अभ्यास व ठरावांनंतर दुपारी १२ वाजता जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होईल. गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

वैदू समाजाच्या अनुभवसंपन्न ज्ञानपरंपरेला काळाच्या पडद्याआड जाऊ न देता तिचे शब्दबद्ध, दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करण्यासाठी या संमेलनाचे महत्त्व अधोरेखित होत आहे. साहित्यप्रेमी, अभ्यासक, संशोधक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आरोग्य प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश गभने यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.