Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शहीद जवानाच्या कुटुंबाप्रती सीआरपीएफची कृतज्ञता; कन्येच्या विवाहातही जपली आपुलकीची नाळ

१ लाख ५१ हजारांची आर्थिक मदत; ९व्या बटालियनच्या अधिकाऱ्यांची विवाहसोहळ्याला उपस्थिती...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : देशाच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती असलेली बांधिलकी केवळ कर्तव्यापुरती मर्यादित नसते, तर ती एका विस्तारित कुटुंबाच्या नात्यातून जपली जाते. याच भावनेतून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ९ क्रमांक बटालियनने शहीद निरीक्षक (सामान्य कर्तव्य) किशन सिंह यांच्या कन्या अक्षिता राठोड यांच्या विवाहप्रसंगी आर्थिक मदतीसह प्रत्यक्ष उपस्थित राहून कुटुंबीयांप्रती आपुलकी व्यक्त केली. जयपूर येथे पार पडलेल्या विवाहसोहळ्यानिमित्त बटालियनच्या वतीने एक लाख ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

कमांडंट शंभू कुमार यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली शहीद जवानाच्या कन्येला विवाहासाठी कपडे, प्रवासी सामानाच्या पेट्या तसेच अन्य भेटवस्तू देण्यात आल्या. विशेष म्हणजे, केवळ आर्थिक मदत देऊन औपचारिकता पूर्ण न करता बटालियनच्या अधिकाऱ्यांनी विवाहसोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. शहीद जवानाच्या कुटुंबाचा आनंद हा संपूर्ण दलाचा आनंद असल्याची भावना या कृतीतून व्यक्त झाली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या विवाहसोहळ्यास ९व्या बटालियनच्या वतीने सहाय्यक निरीक्षक गौरव, हवालदार रामचंद्र बोदारा, हवालदार लालचंद आणि हवालदार सुखबीर सिंह उपस्थित होते. त्यांनी वधू-वरांना शुभेच्छा देत शहीद कुटुंबीयांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित केले.

यावेळी कमांडंट शंभू कुमार यांनी सीआरपीएफच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले. देशाच्या सुरक्षेसाठी जवानांनी केलेले बलिदान कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेणे, त्यांचा सन्मान राखणे आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे ही दलाची नैतिक व संघटनात्मक जबाबदारी आहे. सीआरपीएफ हे केवळ सुरक्षा दल नसून एक विशाल कुटुंब आहे. शहीद जवानांचे कुटुंब या परिवाराचा अविभाज्य भाग असून त्यांना कधीही एकटे पडू दिले जाणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शहीद जवानांच्या स्मृती जपण्यासाठी अनेकदा श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केले जातात; मात्र त्यांच्या कुटुंबीयांच्या आयुष्यातील आनंदाच्या प्रसंगी सहभागी होणे, त्यांच्या अडचणींमध्ये आधार देणे आणि त्यांना आपलेपणाची जाणीव करून देणे, हीदेखील बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची महत्त्वाची कृती आहे. ९व्या बटालियनने विवाहप्रसंगी दाखविलेली आत्मीयता त्याचेच उदाहरण ठरली. देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती दलाची जबाबदारी कायम असल्याचा विश्वास या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले..

Leave A Reply

Your email address will not be published.