Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीच्या भविष्यातील विकासाचा आराखडा आकार घेणार

औद्योगिकीकरण, नागरीकरणासह नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनावर भर; प्रादेशिक योजनेसाठी तज्ज्ञ संस्थांच्या सादरीकरणांचे सत्र...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : जिल्ह्यात वेगाने विस्तारत असलेले औद्योगिकीकरण, पायाभूत सुविधांची वाढती गरज आणि भविष्यातील नागरीकरण लक्षात घेता गडचिरोलीच्या विकासाला नियोजनाची दिशा देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामीण आणि शहरी विकासाचा समतोल राखतानाच वनसंपदा, जलसंपदा आणि पर्यावरणाचे संरक्षण कसे साधता येईल, याचा विचार करून जिल्ह्याची प्रादेशिक योजना तयार केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञ संस्थेच्या नियुक्तीसाठी हालचालींना वेग आला असून, विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी योजनेबाबत आपापली सादरीकरणे केली.

जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक नियोजन मंडळाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली २५ नोव्हेंबर रोजी मंडळाची बैठक झाली. प्रादेशिक योजना तयार करण्यासाठी योग्य तज्ज्ञ संस्थेची निवड आणि नियोजनाच्या विविध पैलूंवर यावेळी चर्चा करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ४(१) अन्वये राज्य शासनाने गडचिरोलीसाठी प्रादेशिक नियोजन मंडळ गठित केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाचा दीर्घकालीन आराखडा तयार करण्याचे नियोजन आहे.

विकासासोबत पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रादेशिक योजनेत जमिनीचा भविष्यातील वापर, कृषी व औद्योगिक विकास, ग्रामीण-शहरी भागांचे नियोजन, रस्ते व वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधांचा विस्तार या बाबींना महत्त्व दिले जाणार आहे. त्याचवेळी जिल्ह्याची समृद्ध वनसंपदा, जलस्रोत आणि पर्यावरणाचे संवर्धन करून विकासाची दिशा निश्चित करण्यावर भर राहणार आहे.

विशेषतः औद्योगिक प्रकल्पांचा विस्तार आणि वाढत्या नागरीकरणामुळे भविष्यात जमिनीच्या वापरात होणारे बदल लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज या बैठकीत अधोरेखित झाली. जिल्ह्याच्या नैसर्गिक संसाधनांचे जतन करत सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साधण्याच्या दृष्टीने विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले प्रस्ताव मांडले.

बैठकीला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, नगररचना विभागाचे सहायक संचालक तसेच प्रादेशिक नियोजन मंडळाचे सदस्य प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्ह्याच्या आगामी विकासाची दिशा निश्चित करताना औद्योगिक प्रगती, नागरी सुविधांचा विस्तार आणि पर्यावरण संवर्धन यांचा समन्वय साधणे, हे या प्रादेशिक योजनेसमोरील महत्त्वाचे आव्हान असणार आहे…

 

Leave A Reply

Your email address will not be published.