देसाईगंजमध्ये २८-२९ नोव्हेंबरला पारंपरिक वैदू साहित्य संमेलन
ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन; लोकसाहित्य, संस्कृती व पारंपरिक ज्ञानावर परिसंवाद...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अनुदानातून आरोग्य प्रबोधिनी, आमगाव (बुटी) यांच्या वतीने देसाईगंज येथे २८ व २९ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय पारंपरिक वैदू साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. लाखांदूर मार्गावरील कस्तुरबा वॉर्डातील हटवार मंगल कार्यालयात हे संमेलन होणार आहे.
वैदू समाजाचे लोकसाहित्य, मौखिक परंपरा, लोकसंस्कृती आणि पारंपरिक ज्ञानाचे जतन व संवर्धन हा संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे.
२८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन होईल. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप ढवळ, आमदार रामदास मसराम, डॉ. मिलिंद नरोटे व धर्मरावबाबा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पारंपरिक वैदू व वन्यजीव अभ्यासक तथा पत्रकार मिलिंद उमरे संमेलनाध्यक्ष, तर भाग्यवान खोब्रागडे स्वागताध्यक्ष आहेत.
तत्पूर्वी ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी तसेच ग्रंथ, वृक्ष व वनौषधी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात वैदू समाजाचे लोकज्ञान, लोककथा-दंतकथा, मौखिक इतिहास, वनौषधी व पारंपरिक ज्ञान, तसेच वैदू परंपरा आणि साहित्य यावर परिसंवाद होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम आणि खुले चर्चासत्रही होईल.
२९ नोव्हेंबर रोजी जैवविविधता उद्यानाला भेट, साहित्य अभ्यास व ठरावांचे सत्र होऊन दुपारी १२ वाजता संमेलनाचा समारोप होईल. यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, विधान परिषद सदस्य अरुण लखाणी व अभिजित वंजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वैदू समाजबांधव, साहित्यिक, संशोधक, अभ्यासक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक डॉ. सूर्यप्रकाश गभने यांनी केले आहे.

