Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एकल पाल्यांच्या पाठीशी आता महाविद्यालयांत समुपदेशकांचे बळ

राज्यातील १,२३८ महाविद्यालयांत नियुक्ती; शिक्षणातील अडचणींसह भावनिक आधारावरही लक्ष

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई, दि. २६ : आई-वडिलांपैकी एकाच पालकाच्या आधारावर शिक्षणाचा प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयीन स्तरावर समुपदेशनाचे बळ मिळणार आहे. आर्थिक, सामाजिक आणि भावनिक अडचणींमुळे त्यांच्या उच्च शिक्षणात खंड पडू नये, यासाठी राज्यातील १,२३८ अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी एका समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे एकल पाल्य विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच मानसिक आधार आणि शासकीय योजनांची माहिती उपलब्ध होणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘एकल पाल्य समुपदेशन’ उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत नियुक्त समुपदेशक विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन करतील. उपलब्ध शासकीय सुविधा, शैक्षणिक योजना आणि मदतीच्या पर्यायांची माहिती देण्यासोबतच गरजेनुसार संबंधित यंत्रणांशी संपर्क साधण्यासाठीही मदत केली जाणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बागला समितीच्या शिफारशींवर उपाययोजना

एकल पाल्य विद्यार्थ्यांची शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती आणि त्यांच्या गरजांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. हेमलता बागला यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने शासनाला शिफारशी सादर केल्या आहेत. राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या एकल पाल्यांची संख्या, त्यांच्यासमोरील अडचणी आणि अपेक्षित मदत यांचा नेमका आढावा घेण्यासाठी राज्यव्यापी सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. समितीच्या शिफारशी आणि सर्वेक्षणातील निष्कर्षांच्या आधारे पुढील उपाययोजना निश्चित केल्या जाणार आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

समुपदेशकांना विशेष प्रशिक्षण

उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी पुणे येथील महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेत (MSFDA) एकदिवसीय मास्टर ट्रेनर्स कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक सार्वजनिक विद्यापीठातून तीन मुख्य प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक आणि विद्यार्थी कल्याण संचालकांचा समावेश आहे.

या कार्यशाळेत एकल पाल्य विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेणे, बागला समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी, संवेदनशील समुपदेशनाची कौशल्ये आणि गरजेनुसार विद्यार्थ्यांना संबंधित सेवा व संस्थांकडे मार्गदर्शनासाठी पाठविण्याच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षक पुढे विद्यापीठ स्तरावर संबंधित महाविद्यालयांतील नियुक्त समुपदेशकांना प्रशिक्षण देतील.

शिक्षणासोबत भावनिक आधारालाही प्राधान्य

महाविद्यालयांतील समुपदेशक विद्यार्थ्यांसाठी विश्वासाचे केंद्र ठरावेत, अशी या उपक्रमाची संकल्पना आहे. केवळ शैक्षणिक अडचणी सोडविण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, भावनिक प्रश्न समजून घेणे आणि उच्च शिक्षणातील त्यांचे सातत्य टिकविणे यावरही भर दिला जाणार आहे.

एकल पाल्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक आणि भावनिक स्तरावर सक्षम करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्था अधिक संवेदनशील, समावेशक आणि विद्यार्थिकेंद्रित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. प्रमोद नाईक, कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, सहसचिव प्रताप लुबाळ, उपसचिव अशोक मांडे, अमोल मुत्याल आणि सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.