Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपूर विभागातील जिल्ह्यांच्या डीपीडीसीचा सोमवारी आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनात बैठक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. 4 फेब्रुवारी: उपमुख्यमंत्री तथा नियोजन मंत्री अजित पवार हे सोमवार दि. 8 फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांची राज्यस्तरीय बैठक घेणार आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हास्तरावर पालकमंत्री अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनांना (डीपीडीसी) मंजुरी देण्याबाबतची राज्यस्तरीय बैठक सोमवारी दुपारी 3 ते 6 वाजेदरम्यान होणार आहे. या बैठकीत विभागातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा अशा अनुक्रमाने जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येईल.

निधीवाटप सूत्रानुसार राज्य शासनामार्फत 2021-22 या आर्थिक वर्षात नागपूर जिल्ह्यासाठी 241.86, वर्धा 110.76, भंडारा 94.18, चंद्रपूर 180.95, गडचिरोली 149.64, गोंदिया 108.39 कोटी अनुज्ञेय नियतव्यय आहे. मात्र प्रत्येक जिल्ह्याने आपला नियतव्यय जिल्हास्तरीय बैठकीत निश्चित केला आहे. नागपूर जिल्ह्याने सन 2021-22 वर्षासाठी एकूण 884.90 कोटीची मागणी केली आहे. जिल्ह्यासाठी 411 कोटीची मर्यादा असून जिल्हा नियोजन समितीने राज्य शासनाकडे 473 कोटींची अतिरिक्त मागणी केली आहे. राज्यस्तरीय मर्यादा 241.86 कोटी आहे. या बैठकीला गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, गोंदियाचे पालकमंत्री अनिल देशमुख, वर्धाचे पालकमंत्री सुनील केदार, भंडारा पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह विदर्भातील जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यांच्या विकासासाठी जास्तीत-जास्त निधी मिळविण्याचे प्रयत्न लोकप्रतिनिधी करणार आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत, असे उपायुक्त, नियोजन शाखा धनंजय सुटे यांनी कळवले आहे.

Comments are closed.