Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देशभक्ती नृत्य करून किलीमांजारो शिखरावर यशची नव्या विक्रमाला गवसणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वाशिम दि,१० ऑक्टोम्बर : वाशीम येथील युवा गिर्यारोहक यश इंगोले याने १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्य दिनी आफ्रिका खंडातील सर्वोच्च किलिमांजारो शिखर गाठले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात तेथे भारतीय तिरंगा फडकविला.यश केवळ किलीमांजारो शिखरावर तिरंगा रोवून थांबला नाही, तर त्याने त्या सर्वोच्च ठिकाणी उणे २५ अंश सेल्सिअस तापमानात केशरी या चित्रपटातील देशभक्तीवर आधारित “तेरी मिट्टी मे मिल जावा, गुल बनके खील जावा, इतनी सी है दिल की आरजू” , या गाण्यावर १ मिनिट ४५ सेकंद नृत्य केले.या नृत्यातून यशने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.त्याच्या या नृत्याची नोंद ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या संस्थेने घेऊन नव्या विक्रमाबाबतचे प्रमाणपत्र व पदक यशला दिले.


बालपणापासूनच ध्येयवेडा असलेल्या यशने अवघ्या १९ व्या वर्षी किलिमांजारो शिखर सर केले. या शिखरावर चढाई करणारे गिर्यारोहक सर्वोच्च ठिकाणी जास्तीत जास्त २० मिनिटे थांबले आहेत.पण यशने उणे २५ अंश सेल्सिअस तापमानात तब्बल तीन तासांपेक्षा जास्त वेळ त्या ठिकाणी थांबून दीड मिनिट नृत्य केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आपल्या आगळ्यावेगळ्या विक्रमाची नोंद व्हावी, यासाठी यशने हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे ऑगस्ट २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात रीतसर ई-मेलवर अर्ज केला.अर्जासोबत यशने नृत्य केलेली ध्वनिचित्रफीत, विविध वृत्तपत्रांमध्ये शिखर सर केल्याच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या, शिखर चढतानाचे विविध फोटो, व्हिडिओ,जिल्ह्यातील वर्ग एकच्या दोन राजपत्रित अधिकाऱ्यांचे पत्र,आफ्रिकन सरकारचे किलीमांजारो शिखर गाठण्याचे पत्र पुरावे म्हणून जोडले.सोबतच पासपोर्ट, आधारकार्ड,वाहन चालविण्याचा परवाना, व्हीसा आदी कागदपत्रेसुद्धा हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेकडे ईमेलद्वारे पाठविण्यात आली. २४ सप्टेंबरला हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने यशच्या जागतिक विक्रमाची नोंद घेऊन संचालकांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व पदक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यशला घरपोच पाठविले. जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी देखील यशच्या या नव्या विक्रमाबद्दल कौतुक केले.

हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने यापूर्वी माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम, प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे, अभिनेता सोनू सूद, क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू व योगगुरू रामदेवबाबा यांना देखील त्यांनी त्यांच्या क्षेत्रात विक्रमी कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यशने सर्वोच्च शिखरावर केलेले नृत्य हे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत असताना केले.ज्या थोर पुरुषांनी व स्वातंत्र्य सैनिकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपले योगदान दिले आणि जे भारतीय सैनिक देशाचे रक्षण करीत आहे,त्यांना अभिवादन म्हणून हे नृत्य यशने किलोमांजारो या सर्वोच्च शिखरावर केले.
आता यशचे पुढचे लक्ष हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे २२ हजार ८३७ फूट उंच असलेले अमेरिकेतील अकाँकागुआ हे शिखर गाठण्याचे आहे.

हे देखील वाचा,

अबब …चक्क चोरी करण्यासाठी विमानाने प्रवास करणाऱ्या सराईत भामट्यांना पोलिसांनी केले जेरबंद.

गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल, येणार गडचिरोली दौऱ्यावर

वन्यजीव सप्ताहात बाईक रॅलीचे आयोजन करून चातगाव वनपरिक्षेत्रात केली जनजागृती

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.