रक्षाबंधनाच्या दिवशी ‘लाडक्या बहिणी’ची चक्क स्ट्रेचरवरून जीवघेणी फरफट!
पूल नाही, रस्ता नाही; पुरातून गरोदर मातेला स्ट्रेचरवरून नेण्याची वेळ — विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
ओमप्रकाश चुनारकर ,
गडचिरोली : एकीकडे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या रक्षणाचा संकल्प केला जात असताना, दुसरीकडे गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात एका गरोदर मातेला रुग्णालय गाठण्यासाठी चक्क पुराच्या पाण्यातून चक्क स्ट्रेचरवरून नेण्याची वेळ आली. एटापल्ली तालुक्यातील कोईंदुळ गावातील हे विदारक वास्तव समोर आले असून, स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही आदिवासी भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम असल्याने प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोईंदुळ गावाला अद्याप पक्का रस्ता नाही. गावाच्या मार्गात दोन नाले असून पावसाळ्यात ते दुथडी भरून वाहतात. शुक्रवारी सकाळी छाया सुरेश नैताम (२६) या गरोदर महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. मात्र, नाल्यांना पूर आल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही.

अशा जीवघेण्या परिस्थितीत ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत महिलेला चक्क स्ट्रेचरच्या साहाय्याने पुराचे पाणी पार केले. दोन नाले पार करून तिला नदीपलीकडे आणण्यात आले. त्यानंतर तेथे पोहोचलेल्या रुग्णवाहिकेतून महिलेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. आरोग्यसेविकाही यावेळी सोबत होत्या.
दरवर्षी तीच फरफट; प्रशासनाला जाग कधी येणार?..
कोईंदुळच्या ग्रामस्थांसाठी ही घटना नवीन नाही. पावसाळा सुरू झाला की नाले दुथडी भरतात आणि रुग्णालय गाठणे म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यासारखे होते. यापूर्वी २० जुलै रोजी पुष्पा परसा या गरोदर महिलेलाही अशाच पद्धतीने नाला पार करून उपचारासाठी न्यावे लागले होते. इतर रुग्णांनाही वारंवार या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.पूल आणि पक्क्या रस्त्यासाठी वारंवार मागणी करूनही प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे ‘विकास’ नेमका कुठे पोहोचला, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
‘आदिवासी भागात सुविधा नाहीत; सरकार फक्त स्टील हब करण्यात व्यस्त’…
कोईंदुळमधील घटनेवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारवर जोरदार निशाणा साधला. शासन गडचिरोलीला ‘स्टील हब’ करण्याच्या घोषणा आणि मोठमोठे विकासाचे दावे करीत आहे; मात्र आदिवासी भागातील दुर्गम गावांमध्ये साधा रस्ता, पूल आणि आरोग्याची सुविधा पोहोचलेली नाही, अशी टीका त्यांनी केली.
‘ज्या भागातून सरकारला महसूल आणि विकासाची अपेक्षा आहे, त्या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारीही शासनाचीच आहे. गरोदर महिलेला पुरातून चक्क स्ट्रेचरवरून रुग्णालयापर्यंत न्यावे लागणे ही केवळ एका कुटुंबाची व्यथा नाही, तर संपूर्ण प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह आहे,’ अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.
दुर्गम भागात प्रशासनाने केवळ कागदावरील योजना न राबवता प्रत्यक्ष सुविधा पोहोचविण्याची गरज आहे. रस्ते आणि पूल नसल्याने एखाद्या रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची वाट प्रशासन पाहणार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या घटनेत आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आणि महिलेला अखेर रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यात आले. मात्र, रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू न शकणे, हीच या संपूर्ण व्यवस्थेतील मोठी विसंगती ठरली आहे. आरोग्यसेवा उपलब्ध असली तरी ती रुग्णाच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी रस्ता नसेल, तर त्या सुविधेचा उपयोग काय, हा प्रश्न या घटनेने पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी ‘बहिणीच्या रक्षणा’च्या घोषणा होत असताना कोईंदुळमधील गरोदर मातेला जीव धोक्यात घालून पुरातून कावडीतून न्यावे लागले. त्यामुळे दुर्गम आदिवासी भागातील रस्ता, पूल आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न आता तरी प्रशासन किती गांभीर्याने घेणार? हा सवाल या घटनेनंतर पुन्हा एकदा उभा ठाकला आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी गरोदर बहिणीला पुरातून नेण्याची वेळ; सरकारला वडेट्टीवारांचा सवाल…
रक्षाबंधन हे भावाने बहिणीला दिलेला विश्वास आणि तिच्या रक्षणाची हमी देणारा दिवस आहे. याच दिवशी एका बहिणीला नालापार करून जावे लागत असेल, गरोदर मातेला पुराच्या पाण्यातून नेण्याची वेळ येत असेल, तर भावाने बहिणीला काय द्यावे आणि त्या भावनेशी आपण खेळतोय, याची जाणीव आहे का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
तुम्ही भाऊ म्हणत असाल आणि सत्ताधारी असाल, तर आधी आपले कर्तव्य पार पाडा. या राज्यात, कुठल्याही जिल्ह्यात गरोदर मातेला पुराच्या पाण्यातून जाऊन येण्याची वेळ येऊ नये, एवढे तरी जपा. मानवता म्हणून जपा, नाते जपा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.
अशा परिस्थितीत गरोदर मातेला ओढून नेण्याची, नालापार करण्याची परिस्थिती येऊ नये. आजचा हा संदेश आहे. सुधारणा करूनही बोलून उपयोग नाही; मात्र संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसार जगतील आणि काहीतरी करतील, असाच विश्वास आपण करतो, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले…

