Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मृत्यूच्या उंबरठ्यावरून मातेला खेचून आणले; अवघे २५% उरलेले हृदय पुन्हा धडकले!

डॉक्टर म्हणजे केवळ उपचारांचे साधन नव्हे, तर संकटाच्या क्षणी प्रत्यक्ष देवाचे रूप घेऊन धावणारा आधार... गडचिरोलीत डॉ. खुशाल दुर्गे यांच्या संवेदनशील प्रयत्नांनी २२ वर्षीय नवमातेला जीवनदान; जुळ्या तान्हुल्यांना परत मिळाली आईची सावली....

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओमप्रकाश चुनारकर, 

गडचिरोली : संसाराची नुकतीच झालेली गोड सुरुवात… घरात पहिल्यांदाच दोन चिमुकल्या जुळ्या पावलांची चाहूल… पण या आनंदाचे रूपांतर क्षणात भयाण काळोखात झाले. प्रसूतीनंतर अवघ्या १५ दिवसांत २२ वर्षांच्या एका निष्पाप मातेचा श्वास अडखळला, ऑक्सिजनची पातळी थेट ४० टक्क्यांवर कोसळली आणि छातीत धडकणाऱ्या हृदयाची ताकद उरली केवळ २५ टक्के! एका बाजूला मृत्यूशी निकराची झुंज देणारी आई आणि दुसऱ्या बाजूला तिच्या दुधाच्या घोट्यासाठी व्याकूळ झालेली दोन तान्ही बाळे… अशा अत्यंत नाजूक क्षणी गडचिरोलीतील ‘श्री अनंत हॉस्पिटल’मध्ये डॉ. खुशाल दुर्गे यांच्या रूपाने जणू प्रत्यक्ष देवच धावून आला आणि त्या मातेला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

​संकटाचा घाला आणि गुदमरलेला श्वास…

​स्थानिक वुमेन्स हॉस्पिटलमध्ये सिझेरियन प्रसूतीद्वारे या महिलेने जुळ्या कन्यारत्नांना जन्म दिला होता. घरात आनंदाचे वातावरण असतानाच पंधरवड्यानंतर तिला तीव्र दम लागण्यास सुरुवात झाली. दिवसेंदिवस तिची प्रकृती इतकी खालावली की तिला साधे बसणे अथवा दोन शब्द बोलणेही अशक्य झाले. रक्तातील ऑक्सिजन पातळी धोकादायक रीतीने घसरल्याने नातेवाईकांचे डोळे पाणावले होते. अशा बिकट अवस्थेत तिला तातडीने श्री अनंत हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

​अचूक निदान आणि शर्थीचे प्रयत्न…

​एम.बी.बी.एस., एम.डी. (मेडिसिन), हृदयरोगतज्ज्ञ व डायबेटोलॉजिस्ट डॉ. खुशाल दुर्गे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एका क्षणाचाही विलंब न लावता अत्याधुनिक तपासण्या केल्या. तपासणीअंती स्पष्ट झाले की, ही नवमाता प्रसूतीनंतर उद्भवणाऱ्या अत्यंत दुर्मीळ आणि जीवघेण्या ‘पोस्टपार्टम कार्डिओमायोपॅथी’ (PPCM) या आजाराने ग्रस्त असून गंभीर ‘हार्ट फेल्युअर’च्या टप्प्यात पोहोचली आहे.

​हृदयाचे ठोके मंदावत असताना डॉ. दुर्गे आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने सलग तीन ते चार तास अहोरात्र, शर्थीचे प्रयत्न केले. आपत्कालीन औषधोपचार, योग्य वैद्यकीय निर्णय आणि संवेदनशील देखरेखीमुळे हळूहळू चमत्कार घडू लागला; त्या मातेचा श्वास पूर्ववत होऊ लागला आणि कोसळलेली ऑक्सिजन पातळी पुन्हा स्थिरावली.

​दुर्गम भागातील गोरगरिबांसाठी ठरले देवदूत…

​गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल व दुर्गम भागात अशा गुंतागुंतीच्या हृदयविकारावर उपचार मिळणे म्हणजे अत्यंत आव्हानात्मक बाब. नागपूर किंवा इतर मोठ्या शहरांत हलवण्याइतका वेळही त्या मातेकडे नव्हता. मात्र, स्थानिक पातळीवरच डॉ. खुशाल दुर्गे यांनी घेतलेला पुढाकार आणि दाखवलेली तत्परता यामुळे एका गरीब कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचला. डॉक्टर हे देवाचेच दुसरे रूप असतात, याची प्रचिती या घटनेने पुन्हा एकदा दिली.

​आईच्या छातीशी घट्ट बिलगलेल्या त्या जुळ्या चिमुकल्या मुली आणि मातेच्या डोळ्यांतील आनंदाश्रू पाहून उपस्थितांचेही डोळे भरून आले. उपचारानंतर पूर्णपणे बऱ्या झालेल्या या मातेला रुग्णालयातून सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला असून, तिच्या नातेवाईकांनी डॉ. दुर्गे आणि श्री अनंत हॉस्पिटलच्या संपूर्ण चमूचे हात जोडून आभार मानले आहेत…

Leave A Reply

Your email address will not be published.