जिच्यासोबत जग फिरायचे होते तीच निघून गेली; २५.५१ लाखांची पुंजी सैनिकांना अर्पण!
निवृत्तीच्या उंबरठ्यावर नियतीचा घाला; नागपूरच्या श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांचा देशसेवेचा हृदयस्पर्शी निर्णय...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रवि मंडावार :
आयुष्यभराच्या कष्टातून उभ्या केलेल्या स्वप्नांना नियतीने अचानक पूर्णविराम दिल्यानंतरही श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या वैयक्तिक दुःखाचे रूपांतर राष्ट्रसेवेत करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. ..
नागपूर : आयुष्यभर संसारासाठी धावपळ केल्यानंतर निवृत्तीनंतरचा काळ पत्नीसोबत आनंदात घालवायचा, जगभ्रमंती करायची आणि उरलेले आयुष्य तिच्या सहवासात जगायचे, असे स्वप्न अनेकजण पाहतात. नागपूर येथील बँकेत लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांनीही असेच स्वप्न उराशी बाळगले होते. त्यासाठी त्यांनी काटकसरीने पै-पै साठवत तब्बल २५ लाख ५१ हजार रुपयांची पुंजी जमा केली होती. मात्र नियतीने त्यांच्या या स्वप्नावर काळाची रेष ओढली.

सेवानिवृत्तीला अवघे सहा महिने शिल्लक असताना त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले. पत्नीच्या जाण्याने केवळ जीवनसाथीच हरपली नाही, तर अनेक वर्षे जपलेले जगभ्रमंतीचे स्वप्नही एका क्षणात उद्ध्वस्त झाले. आयुष्यभर जिच्यासाठी आणि जिच्यासोबत हे क्षण जगायचे ठरवले होते, तीच साथ निघून गेल्याने सहस्त्रबुद्धे यांच्यासमोर भावनिक पोकळी निर्माण झाली.

मात्र या दुःखातही त्यांनी खचून न जाता एक असा निर्णय घेतला, ज्याची आज सर्वत्र चर्चा होत आहे. ज्या पैशांतून पत्नीसोबत जग फिरायचे होते, ती संपूर्ण रक्कम त्यांनी भारतीय सैन्याच्या कल्याणासाठी अर्पण करण्याचे ठरविले. त्यांनी जमा केलेले २५ लाख ५१ हजार रुपये ‘आर्मी सेंट्रल वेलफेअर फंड’ ला दान केले.
लोकस्पर्श न्यूजशी संवाद साधताना सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “मला पत्नीसोबत जग फिरता आले नाही. तीच माझ्या स्वप्नांची साथीदार होती. आता हा पैसा माझ्यासाठी नव्हता. देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी तो उपयोगी पडावा, एवढीच इच्छा होती.”
त्यांच्या या उदात्त कृतीमुळे समाजाच्या विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. वैयक्तिक दुःखाचे राष्ट्रसेवेत रूपांतर करणारा हा निर्णय प्रेम, त्याग आणि देशभक्तीचा दुर्मीळ संगम म्हणून पाहिला जात आहे. आजच्या स्वकेंद्रित युगात सहस्त्रबुद्धे यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि राष्ट्रनिष्ठा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे..
पत्नीच्या आठवणींना देशसेवेची सलामी…
जगभ्रमंतीचे स्वप्न अपुरे राहिले, जीवनसाथीची साथही निसटली; मात्र श्रीकांत सहस्त्रबुद्धे यांनी दुःखात बुडून न जाता आयुष्यभराची बचत सैनिकांच्या कल्याणासाठी अर्पण केली. पत्नीच्या स्मृतींना दिलेली ही अनोखी मानवंदना आणि देशासाठी व्यक्त केलेली कृतज्ञता समाजाला माणुसकीचा नवा संदेश देऊन जात आहे…

