Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हा शल्यचिकित्सकांविरोधातील तक्रारीवर पुन्हा चौकशी; आंदोलन मागे घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

आधी त्रिसदस्यीय समितीची चौकशी; आता चार सदस्यीय समिती पुन्हा रुग्णालयात दाखल होणार...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या कामकाजाबाबत करण्यात आलेल्या तक्रारीने आता नवे वळण घेतले आहे. तक्रारीची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली असून, यापूर्वी त्रिसदस्यीय चौकशी समितीकडून चौकशी झाल्यानंतर आता चार सदस्यीय समितीमार्फत पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यासंदर्भात आरोग्य सेवा, नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांनी आंदोलनकर्त्या अमिता शामकांत मडावी यांना लेखी पत्र दिले आहे. तक्रारीच्या अनुषंगाने विभागाकडून नियमानुसार कार्यवाही सुरू असल्याने शासकीय कार्यालयासमोर सुरू असलेले धरणे/ठिय्या आंदोलन तात्काळ मागे घेऊन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन पत्रातून करण्यात आले आहे.

तक्रारीच्या अनुषंगाने यापूर्वीच १४ जुलै २०२६ रोजी त्रिसदस्यीय चौकशी समितीने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून चौकशी केली होती. तक्रारीतील विविध मुद्द्यांची स्वतंत्रपणे पडताळणी करून समितीने निरीक्षणे व निष्कर्ष नोंदविले आहेत. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासाही मागविण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मात्र, तक्रारीतील बाबींची पुन्हा पडताळणी करण्यासाठी ११ ऑगस्ट रोजी चार सदस्यीय चौकशी समिती गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होणार आहे. समितीकडून संबंधित तक्रारीतील मुद्द्यांची पुन्हा चौकशी केली जाणार आहे.

चौकशी अहवालाच्या आधारे आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही नियमानुसार करण्यात येईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता दुसऱ्या चौकशी समितीच्या पाहणीत काय निष्पन्न होते, तक्रारीतील आरोपांबाबत काय निष्कर्ष समोर येतात आणि त्यानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे गडचिरोलीतील आरोग्य क्षेत्राचे लक्ष लागले आहे…

Leave A Reply

Your email address will not be published.