Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तीन चिमुकल्यांचा बळी घेऊनही प्रशासन जागे होणार कधी – सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे 

जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाने सुरक्षाव्यवस्थेचे वाभाडे; मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख, वारसाला नोकरीची मागणी..

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी : जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना सर्पदंश होऊन तीन निष्पाप मुलींना जीव गमवावा लागला, तर अन्य विद्यार्थिनी मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न केवळ ऐरणीवर आणलेला नाही, तर शासनाच्या देखरेख व्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

विद्यार्थी वसतिगृहात सुरक्षित आहेत की केवळ कागदोपत्री व्यवस्था पूर्ण आहे? विद्यार्थ्यांच्या निवासाची सुरक्षितता, सर्पप्रतिबंधक उपाययोजना, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी वेळोवेळी होते का, असा सवाल उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांनी शासनाला सवाल केला आहे..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जपतलाईतील दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत, उपचाराधीन विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये, तसेच मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी अलोणे यांनी केली आहे.

आदिवासी दिन’ उत्सवात, पण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय?…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन. देशभर आदिवासी संस्कृतीचा गौरव होत असतानाच आदिवासी विद्यार्थिनींच्या वसतिगृहात मृत्यूचा सापळा निर्माण होणे ही व्यवस्थेसाठी गंभीर आत्मपरीक्षणाची बाब आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अलोणे यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील अनेक आश्रमशाळांमध्ये आजही पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि आवश्यक भौतिक सुविधांचा अभाव असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच त्यांना सुरक्षित निवास देणे ही शासन आणि संबंधित संस्थांची मूलभूत जबाबदारी नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

आता चौकशी नव्हे, जबाबदारी निश्चित करा!..

जपतलाईच्या घटनेनंतर केवळ चौकशी समित्या नेमून प्रकरण थंड होऊ नये. त्रुटी कुठे राहिली, विद्यार्थिनी जमिनीवर का झोपल्या, सुरक्षेच्या उपाययोजना काय होत्या आणि संबंधित यंत्रणेकडून नियमित पाहणी झाली होती का, या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने जनतेसमोर ठेवावीत, अशी मागणी अलोणे यांनी केली.

भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आश्रमशाळेची सुरक्षा आणि मूलभूत सुविधांची तातडीने प्रत्यक्ष तपासणी करून त्रुटी आढळणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मृत विद्यार्थिनी : सुश्मिता सरोजित मंडल (१४), दीपिका इतवा लकडा (१२), अनु गाजुराम कोरटी (८)

उपचाराधीन : दीपिका बिलकुरासाय मडावी (११), समृद्धी सुरेश नैताम (१४), कविता राजकुमार किरंगा (१२)

 

Leave A Reply

Your email address will not be published.