मालेवाडा ते जिमलगट्टा; गडचिरोलीत महसूल प्रशासनाचा नवा विस्तार!
सहा ठिकाणी अपर तहसीलदार कार्यालये; तालुका मुख्यालयाची धावपळ, वेळ आणि प्रवासखर्च वाचणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना महसुली सेवांसाठी तालुका मुख्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी प्रशासनाने महसूल यंत्रणा थेट नागरिकांच्या जवळ नेण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडचिरोली जिल्ह्यात सहा नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा, आरमोरीतील वैरागड, धानोऱ्यातील पेंढरी, सिरोंचातील आसरअल्ली, एटापल्लीतील कसनसूर आणि अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथे ही कार्यालये सुरू होणार आहेत.
दुर्गम गावांसाठी प्रशासनाचे नवे ‘दालन’
महसुली दाखले, जमिनीचे फेरफार, विविध जमीनविषयक कामे, संजय गांधी निराधार योजना यासह अनेक शासकीय सेवांसाठी नागरिकांना दूरवर जावे लागते. विशेषतः दुर्गम गावांतील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास वेळखाऊ आणि खर्चिक ठरतो. नवीन अपर तहसीलदार कार्यालयांमुळे या सेवांचा लाभ स्थानिक पातळीवर अधिक सुलभ आणि जलदगतीने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तात्पुरत्या इमारतीत सुरुवात; कायमस्वरूपी कार्यालयांची तयारी
सुरुवातीला ही कार्यालये तात्पुरत्या इमारतींमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर कायमस्वरूपी कार्यालयीन इमारती उभारण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे निर्णयाच्या अंमलबजावणीला गती देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
गडचिरोलीच्या विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्रात महसूल प्रशासनाचे हे विकेंद्रीकरण महत्त्वाचे मानले जात आहे. प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेत सहा नवीन कार्यालयांची भर पडल्याने दुर्गम भागातील नागरिकांची शासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी होण्याची अपेक्षा आहे.
“गडचिरोली जिल्ह्यातील तळागाळातील, ग्रामीण आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांना महसुली सेवांचा लाभ सहज व जलद मिळावा, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या नवीन कार्यालयांमुळे जनतेचा वेळ आणि प्रवासखर्च वाचेल तसेच प्रशासकीय कामांना गती मिळेल,” अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

