जंगलमहलमध्ये ‘लाल वादळ’ शमले: दोन दशकांनंतर तीन कुख्यात माओवादी पोलिसांच्या शरण; AK-47 सह शस्त्रांचा मोठा साठा जप्त
खासदार सुनील महतो हत्याकांडातील संशयित व १५ लाखांचे बक्षीस असलेला रामप्रसाद पोलिसांच्या जाळ्यात; तिघांवर ८० हून अधिक गंभीर गुन्हे; नंदीग्राम आंदोलनातून माओवादात गेलेली नयनताराही शरण...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बांकुरा (पश्चिम बंगाल) : गेल्या दोन दशकांपासून पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या सीमावर्ती जंगलांमध्ये दहशत माजवून यंत्रणांना चकवा देणाऱ्या माओवादी चळवळीला सुरक्षा दलांनी मोठा सुरुंग लावला आहे. बंदी घातलेल्या ‘भाकप (माओवादी)’ या नक्षली संघटनेच्या तीन वरिष्ठ आणि कुख्यात कॅडरांनी बांकुरा येथे पश्चिम बंगाल पोलिसांसमोर अधिकृतरीत्या आत्मसमर्पण केले. या शरणगतीमुळे जंगलमहल भागातील माओवाद्यांचे उरलेसुरले भूमिगत नेटवर्क अक्षरशः उद्ध्वस्त झाले असून, सीमावर्ती भागातील ‘लाल आतंक’ संपण्याच्या दिशेने हे अत्यंत मोठे पाऊल मानले जात आहे.
आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांमध्ये १५ लाखांचे बक्षीस असलेला रामप्रसाद मंडी ऊर्फ महादेव/सचिन, जाबा महतो ऊर्फ बुलू/गौरी आणि नयनतारा साहू ऊर्फ मिता/झुमा यांचा समावेश आहे. रामप्रसाद हा बंगाल-झारखंड-ओडिशा रिजनल कमिटीचा महत्त्वाचा सदस्य होता, तर जाबा महतो आणि नयनतारा या झोनल कमिटीच्या पातळीवर संघटनात्मक सूत्रे हलवत होत्या.

८० हून अधिक गुन्ह्यांचा डाग; सुरक्षा दलांवरील हल्ल्यांचे सूत्रधार..
पोलिसांनी दिलेल्या अधिकृत नोंदीनुसार, या तिघांवर एकत्रितपणे विविध राज्यांत ८० हून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये सुरक्षा दलांवर थेट प्राणघातक हल्ले, स्फोट घडवून आणणे, खंडणी आणि विध्वंसक कारवायांचा समावेश आहे.
रामप्रसाद मंडी: एकट्या रामप्रसादवर ४४ गुन्हे दाखल असून त्याच्यावर झारखंड सरकारने १५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते.
नयनतारा साहू: १९ गंभीर गुन्ह्यांची नोंद.
जाबा महतो: १८ गुन्ह्यांत थेट सहभाग.
AK-47, INSAS सह मोठा शस्त्रसाठा जप्त...
आत्मसमर्पण प्रक्रियेदरम्यान आणि त्यांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सुरक्षा यंत्रणांनी जंगलातून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा ताब्यात घेतला आहे. यामध्ये—
- ‘AK-47’ असॉल्ट रायफल
- ‘INSAS’ रायफल्स
- १० मॅगझिन
- १५४ जिवंत काडतुसे (Live Cartridges)
यांचा समावेश आहे. नक्षलवाद्यांनी शरण येताना आधुनिक शस्त्रे पोलिसांच्या हवाली केल्याने त्यांच्याकडील संहारक क्षमतेला मोठा तडा गेला आहे.
नंदीग्रामच्या आंदोलनातून सशस्त्र क्रांतीकडे नयनताराची पार्श्वभूमी..
शरण आलेल्या नयनतारा साहूची पार्श्वभूमी अत्यंत संवेदनशील ठरली आहे. नंदीग्राममधील सोनाचुरा येथील मूळ रहिवासी असलेली नयनतारा २००७ मधील ऐतिहासिक नंदीग्राम आंदोलनादरम्यान ‘मातंगिनी महिला समिती’मध्ये सक्रीय होती. याच आंदोलनाच्या धुमश्चक्रीत ती माओवादी विचारसरणीकडे ओढली गेली आणि थेट सशस्त्र दलात दाखल झाली. त्यानंतर तिने दोन दशके जंगलमहल भागात पक्षाचा विस्तार आणि रणनीती आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
सुनील महतो हत्या आणि शिल्दा कॅम्पवरील रक्तपात…
रामप्रसाद मंडी हा सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर अनेक वर्षांपासून होता. २००७ मध्ये जमशेदपूरचे तत्कालीन खासदार सुनील महतो यांची दिवसाढवळ्या झालेली थरारक हत्या आणि २०१० मधील कुख्यात शिल्दा EFR कॅम्पवरील रक्तरंजित हल्ला—ज्यात अनेक जवान शहीद झाले होते—या दोन्ही प्रकरणांत संशयित सूत्रधार म्हणून रामप्रसादचे नाव अग्रस्थानी होते. याव्यतिरिक्त २०१० च्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस घातपाताच्या चौकशीतही त्याची चौकशी झाली होती.
उरलेसुरले नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यता…
झारखंडमधील पूर्व सिंहभूम, पश्चिम बंगालमधील झारग्राम, बांकुरा, पुरुलिया आणि पश्चिम मेदिनीपूर या सीमावर्ती पट्ट्यात या तिघांचे दांडगे संपर्कजाळे होते. सातत्याने सुरू असलेले संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन, यंत्रणांची वाढती पकड आणि संघटनेतील वाढती अस्वस्थता यांमुळे या तिघांनी शरणागती पत्करली. शासनाच्या अधिकृत पुनर्वसन धोरणानुसार आता त्यांची पुढील व्यवस्था केली जाणार आहे. या तीन बड्या म्होरक्यांच्या शरण येण्यामुळे आता नक्षल्यांचे उर्वरित कॅडर, सुरक्षित तळ आणि रसद पुरवठा यंत्रणेची गुपिते उलगडणार असून, जंगलमहल पूर्णपणे नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे…

