पूरग्रस्त भामरागडमध्ये तीन गंभीर रुग्णांचे एअरलिफ्ट; हेलिकॉप्टरने हेडरीत हलविले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात पूरस्थितीमुळे संपर्काची मोठी अडचण निर्माण झाल्याने तीन गंभीर रुग्णांना तातडीने एअरलिफ्ट करण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने ही आपत्कालीन मोहीम राबवली. सात वर्षीय संगीता चुक्कू उसेंडीसह अपेक्षा ऋषी आलाम आणि रोशन चिना मडावी या तिघांना हेलिकॉप्टरने लाहेरीहून हेडरी येथे पुढील उपचारांसाठी हलविण्यात आले. यातील एका रुग्णाला सिकलसेलचा त्रास असल्याची माहिती आहे.

भामरागड तालुक्यातील पूरग्रस्त आणि दुर्गम भागात तीन रुग्णांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. बिनागुंडा येथून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलेल्या सात वर्षीय संगीता उसेंडीला पुढील उपचारांची गरज असल्याने तिला हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. यासोबतच अपेक्षा आलाम आणि रोशन मडावी या दोन रुग्णांनाही हेडरी येथे हलविण्यात आले. लॉइड्स मेटल्सच्या हेलिकॉप्टरचा आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यात आला. प्रकल्प अधिकारी अमर राऊत आणि तहसीलदार किशोर बागडे यांनी रुग्णांच्या स्थलांतरासाठी समन्वय साधला. प्रशासनाच्या तत्परतेमुळे तिन्ही रुग्णांना वेळेत पुढील उपचारासाठी पोहोचविण्यात आले.
