पर्लकोटा नदीला महापूर; भामरागड पुन्हा जनसंपर्क तुटला
जुना पूल पाण्याखाली गेल्याने तालुक्याचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर, प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीत पावसाचे रौद्ररूप पुन्हा पाहायला मिळत असून भामरागड परिसरावर पुन्हा एकदा जलसंकटाचे सावट पसरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि छत्तीसगडच्या पाणलोट क्षेत्रातील जलप्रलयामुळे पर्लकोटा आणि इंद्रावती नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. पर्लकोटा नदीवरील जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून भामरागड तालुक्याचा संपर्क कोणत्याही क्षणी तुटण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

इंद्रावतीचा विळखा, पर्लकोटाचा हाहाकार
छत्तीसगडमधील जगदलपूर आणि चिंदनार येथील मापन केंद्रांवर इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची नोंद झाली आहे. इंद्रावतीच्या या उधाणाचा थेट फटका पर्लकोटा नदीला बसला असून, गुरुवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या संततधारेने पाण्याची पातळी अत्यंत वेगाने वाढली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १३०-डी (NH-130D) वरील भामरागडचा जुना पूल पूर्णतः बुडाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुलाच्या दोन्ही बाजूंना पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, बॅरिकेड्स लावून वाहतूक व नागरिकांची वर्दळ रोखण्यात आली आहे.
दरवर्षीचा तोच आक्रोश : नव्या पुलाचे काम रखडलेलेच!..
भामरागडवासीयांसाठी पुराची ही समस्या नवीन नाही; पावसाळा आला की तालुक्याचा जगाशी संपर्क तुटणे हा इथल्या जनतेच्या पाचवीलाच पुजलेला शाप ठरला आहे. पाण्याखाली जाणाऱ्या या जुन्या पुलाला सक्षम पर्याय म्हणून नव्या उंच पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते, मात्र प्रशासकीय अनास्था आणि संथ गतीने चाललेल्या कामामुळे हा प्रश्न अद्यापही अधांतरीच आहे. “दरवर्षी आम्ही पाण्याचा वेढा सहन करायचा का?”, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत असून, नव्या पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.
प्रशासन सज्ज; नदीकाठच्या गावांना ‘हाय अलर्ट’..
पूरपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे. सखल भाग आणि नदीकाठच्या गावांमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला असून स्थानिक महसूल, पोलीस व आपत्कालीन पथके परिस्थितीवर २४ तास लक्ष ठेवून आहेत. पुराच्या पाण्यात कोणीही उतरण्याचे धाडस करू नये, सुरक्षित स्थळी थांबावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

