Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपली; तुळशीच्या डोक्यावर आले हक्काचे छत!

लाहेरीच्या माडिया गोंड महिलेचे ‘पीएम-जनमन’मधून पक्क्या घराचे स्वप्न साकार; प्रशासन पोहोचले थेट दारापर्यंत..

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : पावसाची सर आली की छपरातून घरात टपकणारे पाणी… बदलत्या हवामानाची चिंता… आणि प्रत्येक पावसाळ्यात डोक्यावर सुरक्षित छत असेल का, ही धाकधूक. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी येथील तुळशी दस्सा पिडसे यांच्या आयुष्यातील हीच वर्षानुवर्षांची वस्तुस्थिती. आई आणि भावाच्या निधनानंतर कौटुंबिक आधारही हरपला. मात्र, परिस्थितीपुढे न झुकता झोपडीतील दिवस ढकलणाऱ्या तुळशी यांच्या आयुष्यात अखेर आश्वासक पहाट उगवली.

‘पीएम-जनमन’ योजनेतून मिळालेल्या पक्क्या घराने तुळशी यांच्या डोक्यावर केवळ छत उभे केले नाही, तर वर्षानुवर्षांच्या असुरक्षिततेला पूर्णविराम देत त्यांच्या जगण्याला सुरक्षिततेची नवी किनार दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विशेष दुर्बल आदिवासी समूहातील माडिया गोंड समाजातील तुळशी पिडसे यांना सन २०२४-२५ मध्ये ‘पीएम-जनमन’ अंतर्गत घरकुल मंजूर झाले. प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीतही घराचे बांधकाम पूर्ण झाले आणि बुधवारी नव्या घरात त्यांच्या आयुष्यातील एक भावनिक क्षण अवतरला—गृहप्रवेशाचा.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने दिवा प्रज्वलित करून गृहप्रवेश करण्यात आला. अनेक वर्षे ज्या सुरक्षित घराची आस होती, ते घर प्रत्यक्षात उभे राहिल्याचा आनंद यावेळी तुळशी यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आई आणि भावाच्या निधनानंतर तुळशी यांचा कौटुंबिक आधारच संपला. छोट्याशा झोपडीत त्यांनी अनेक वर्षे काढली. पावसाळ्यात तर ही झोपडी म्हणजे सुरक्षित निवारा न राहता संकटाचे ठिकाण बनत असे. छपरातून घरात येणारे पाणी, बदलते हवामान आणि असुरक्षिततेची भावना यामुळे प्रत्येक दिवस आव्हानात्मक होता.

मात्र, ‘पीएम-जनमन’ने त्यांच्या आयुष्याची हीच परिस्थिती बदलण्यास सुरुवात केली. पक्क्या भिंती, सुरक्षित छप्पर आणि स्वतःचे घर मिळाल्याने तुळशी यांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

प्रशासन पोहोचले थेट लाभार्थ्याच्या दारात

‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी लाहेरी येथे भेट देऊन तुळशी यांच्या नव्या घराची पाहणी केली. यावेळी त्यांनी तुळशी यांच्याशी संवाद साधत घरकुल मंजुरीपासून बांधकाम पूर्ण होईपर्यंतच्या प्रक्रियेची माहिती घेतली. नव्या घरामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात झालेले बदल आणि मिळालेली सुरक्षितता याबाबतही त्यांनी विचारपूस केली.

अतिदुर्गम भागातील एका लाभार्थ्याच्या घरापर्यंत प्रशासन प्रत्यक्ष पोहोचल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शासकीय योजना केवळ कागदावर न राहता ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचते का, याचा क्षेत्रीय स्तरावर घेतला जाणारा आढावा या भेटीतून अधोरेखित झाला.

दुर्गम भागातील घरकुलांना गती

विशेष दुर्बल आदिवासी समूहातील कुटुंबांना पक्के आणि सुरक्षित घर मिळावे, या उद्देशाने ‘पीएम-जनमन’ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात घरकुलांची कामे सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ८७२ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.

दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळताना अडथळे येऊ नयेत, यासाठी प्रशासनाकडून क्षेत्रीय पाहणी आणि नियमित आढावा घेतला जात आहे. मंजूर घरकुलांची कामे निर्धारित कालावधीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

तुळशी यांच्या नव्या घरातील गृहप्रवेशाचा क्षण हा केवळ एका घराचे बांधकाम पूर्ण झाल्याचा सोहळा नव्हता. तो होता—वर्षानुवर्षे असुरक्षिततेत जगलेल्या एका महिलेच्या आयुष्यात सुरक्षिततेचे छत उभे राहिल्याचा क्षण.

झोपडीच्या गळक्या छपरापासून पक्क्या घराच्या सुरक्षित छतापर्यंतचा तुळशी यांचा हा प्रवास ‘पीएम-जनमन’ योजनेच्या लाभाचा आकडा नसून, बदललेल्या आयुष्याची जिवंत कहाणी ठरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.