Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिंजगावच्या सीताराम मडावींचा दिल्लीत ‘जलयोद्धा’ सन्मान

२३ वर्षांची जलसंधारणाची तपश्चर्या राष्ट्रीय मंचावर पोहोचली; १८४ गावांतील ११,५०० हेक्टरला पाण्याचा आधार...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : पावसाचे पाणी वाहून जायचे, उन्हाळा आला की नद्या-नाले आटायचे आणि पाण्याअभावी शेतीसमोर प्रश्नचिन्ह उभे राहायचे. भामरागडसारख्या दुर्गम तालुक्यातील जिंजगावने मात्र या परिस्थितीला नियती मानून स्वीकारले नाही. गावाने पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवण्याचा संकल्प केला आणि या संकल्पाला तब्बल २३ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड मिळाली. याच लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या जलसंधारणाच्या प्रयोगाची आता राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

जिंजगावचे प्रयोगशील शेतकरी आणि जलसंधारण कार्यकर्ते सीताराम मडावी यांना नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे सुरू असलेल्या नवव्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताहात ‘जलयोद्धा’ म्हणून गौरविण्यात आले. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या दीर्घकालीन जलसंधारण कार्याचा गौरव झाला. भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताह २२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘क्लायमेट रेझिलिएंट वॉटर मॅनेजमेंट’ या व्यापक विषयावर आयोजित करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

देशभरातून निवडण्यात आलेल्या ग्रामीण जलयोद्ध्यांमध्ये महाराष्ट्रातून मडावी यांची निवड झाली. त्यामुळे गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात ग्रामस्थांच्या सहभागातून उभा राहिलेला जलसंधारणाचा प्रयोग थेट देशाच्या आंतरराष्ट्रीय जलमंचावर पोहोचला आहे.

पाण्याने बदलली गावाची दिशा…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दोन दशकांहून अधिक काळापूर्वी जिंजगावसमोरील आव्हान वेगळे होते. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध व्हायचे; मात्र ते साठवण्याची व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी वाहून जायचे. उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र व्हायची आणि त्याचा थेट परिणाम शेतीवर होत असे.

ही परिस्थिती बदलण्यासाठी मडावी यांनी ग्रामस्थांना सोबत घेत ‘पावसाचे पाणी गावाबाहेर जाऊ द्यायचे नाही’ हा विचार प्रत्यक्ष कामात उतरवला. तलावांचे खोलीकरण, बंधारे, पाणलोट क्षेत्रातील कामे आणि उपलब्ध पाण्याचे नियोजन अशा विविध उपाययोजनांतून गावाने जलसंधारणाला चळवळीचे स्वरूप दिले. यासोबतच शेतीतही प्रयोग झाले. भातशेतीत सघन लागवड पद्धतीचा वापर करून उपलब्ध पाण्यात अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. जलसंधारण आणि शेतीतील बदल यांची सांगड घातल्याने पाण्याची उपलब्धता वाढण्याबरोबरच शेती अधिक टिकाऊ करण्याच्या दिशेनेही वाटचाल झाली.

एका गावातून १८४ गावांपर्यंत…

जिंजगावपुरता मर्यादित न राहता हा अनुभव पुढे इतर गावांपर्यंत पोहोचला. गेल्या २३ वर्षांत मडावी यांनी आदिवासी शेतकऱ्यांना एकत्रित करून १८४ गावांमध्ये जलसंधारण आणि पाणलोट विकासाची कामे राबवली. या प्रयत्नातून तब्बल ११ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात पाणी अडवणे, भूजल पातळी वाढवणे आणि शेतीला अधिक शाश्वत आधार देण्याचे काम झाल्याचे सांगण्यात आले आहे.

जिंजगावचा प्रयोग आता राष्ट्रीय चर्चेचा विषय..

नवी दिल्लीतील भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताहात जगभरातील जलक्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत. बदलते हवामान, वाढते पाणी संकट आणि त्याला सामोरे जाण्यासाठी शाश्वत जलव्यवस्थापन या विषयांवर येथे विचारमंथन सुरू आहे.

या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मडावी यांनी गडचिरोलीतील जलसंधारणाच्या अनुभवाला मांडणी दिली. दुर्गम आदिवासी भागातील ग्रामस्थांनी स्वतःच्या सहभागातून पाण्याचे नियोजन करून उभा केलेला प्रयोग आता देशाच्या जलचर्चेचा भाग बनला आहे.

गावकऱ्यांच्या श्रमाला दिल्लीचा गौरव

‘जलयोद्धा’ हा सन्मान केवळ सीताराम मडावी यांच्या वैयक्तिक कार्याची पावती नसून, जिंजगावसह जलसंधारणाच्या कामात सहभागी झालेल्या ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांचीही दखल मानली जात आहे. ज्या भागात कधी पावसाचे पाणी वाहून जाणे आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती हीच वस्तुस्थिती होती, त्याच भागातून पाण्याचा थेंब अडविण्याचा संदेश देशाच्या राजधानीत पोहोचला.

जिंजगावच्या मातीत सुरू झालेली २३ वर्षांची ही जलचळवळ आता राष्ट्रीय मंचावर पोहोचली आहे. गावाच्या शिवारात अडवलेला पाण्याचा थेंब अखेर दिल्लीच्या भारत मंडपम् पर्यंत पोहोचला—आणि त्या थेंबामागच्या जिद्दीला मिळाला ‘जलयोद्धा’चा सन्मान मिळाल्याने गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.