इंजेवारीत वाघाचा शेतकऱ्यावर हल्ला, परिसरात भीती
निळकंठ लाकडे गंभीर जखमी; आरमोरीत प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात हलविले, वनविभागाकडून १० ट्रॅप कॅमेऱ्यांनी नजर...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी : बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सुमारे ८ वाजता इंजेवारी गावालगतच्या जंगल परिसरात घडली. या हल्ल्यात निळकंठ नामदेव लाकडे (रा. इंजेवारी) यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
लाकडे हे सकाळच्या सुमारास बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी इंजेवारी गावालगतच्या जंगलात गेले होते. याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. हल्ल्यात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर जखमी लाकडे यांना तातडीने आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे, क्षेत्र सहाय्यक एस. पी. तिजारे आणि नियत वनरक्षक एम. एम. राऊत यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी शेतकऱ्याची भेट घेतली. त्यांनी हल्ल्याची माहिती जाणून घेत लाकडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
घटनेनंतर इंजेवारीसह देऊळगाव आणि परिसरातील जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाचा परिसरात मुक्त संचार असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने घटनास्थळासह संबंधित जंगल परिसरात तब्बल १० ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाघाच्या हालचालींची नोंद घेत त्याच्या संचाराचा मागोवा घेण्याचे काम वनविभागाकडून सुरू आहे. वनकर्मचाऱ्यांचे पथकही परिसरात लक्ष ठेवून आहे.
जंगलालगतच्या गावांतील नागरिकांनी अनावश्यकपणे जंगलात जाणे टाळावे. अत्यावश्यक कारणासाठी जंगलात जावे लागल्यास एकट्याने जाऊ नये आणि विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या वेळी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे. वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या भागात नागरिकांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वाघाच्या हालचालींवर वनविभाग कितपत प्रभावी नियंत्रण ठेवतो, याकडे इंजेवारीसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

