Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विदर्भाच्या लेकीची गगन भरारी; अमेरिकेत प्रशिक्षण, एअर इंडियात पायलट म्हणून निवड

कु. विधी बाजोरिया हिच्या यशाने वणीचा गौरव; ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरली कामगिरी...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

विशेष प्रतिनिधी : सचिन कांबळे,

यवतमाळ : वणी येथील कु. विधी बाजोरिया हिने जिद्द, मेहनत आणि मोठे स्वप्न पाहण्याची हिंमत असेल, तर कोणतेही ध्येय अशक्य नसते, याचे प्रेरणादायी उदाहरण कु. विधी हिने घालून दिले आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत पुढे आलेल्या विधीची देशातील आघाडीच्या विमान कंपनीत असलेल्या एअर इंडियामध्ये पायलट म्हणून निवड झाली असून तिच्या या यशामुळे वणीसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचा मान उंचावला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वणीतील प्रतिष्ठित बाजोरिया कुटुंबातील विधीने पारंपरिक व्यावसायिक क्षेत्राची वाट न निवडता आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहिले. त्या स्वप्नाचा पाठपुरावा करत तिने सातत्यपूर्ण परिश्रम, कठोर प्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या बळावर वैमानिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

विधीचे प्राथमिक शिक्षण चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे झाले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण नागपूरमध्ये पूर्ण करून तिने उच्च शिक्षणासाठी मुंबईची वाट धरली. याच काळात विमानचालन क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार अधिक दृढ झाला. त्यासाठी तिने अमेरिकेतील फ्लाइट ट्रेनिंग सेंटरमध्ये तब्बल १५ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणादरम्यान विमान उड्डाणाचे तांत्रिक ज्ञान, सुरक्षा मानके आणि प्रत्यक्ष उड्डाणाचा अनुभव तिने आत्मसात केला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कठोर मेहनतीच्या जोरावर अखेर तिची एअर इंडियामध्ये पायलट म्हणून निवड झाली. वणीसारख्या ग्रामीण भागातील एका मुलीने राष्ट्रीय स्तरावरील विमान वाहतूक क्षेत्रात झेप घेतल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आजही अनेक मुली मोठी स्वप्ने पाहण्यास कचरतात. मात्र विधी बाजोरियाचे यश हे ग्रामीण भागातील मुलींना नवे आकाश गाठण्याची प्रेरणा देणारे ठरत आहे. परिस्थिती, गाव किंवा पार्श्वभूमी यशाच्या आड येत नाही, तर जिद्द आणि चिकाटीच यशाचा खरा मार्ग असतो, हे विधीने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.

पायलट व्हायचंय’ म्हणणाऱ्या मुलींसाठी प्रेरणादायी संदेश..

वणीच्या कु. विधी बाजोरिया हिने सिद्ध करून दाखवले की, स्वप्नांना पंख असतात आणि त्या पंखांना बळ देते ती मेहनत. ग्रामीण भागातील मुलींनीही डॉक्टर, अभियंता, अधिकारी यांच्यासोबतच वैमानिक, संरक्षण, अवकाश संशोधन आणि विमान वाहतूक यांसारख्या क्षेत्रांकडे आत्मविश्वासाने वाटचाल करावी, असा संदेश तिच्या यशातून मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.