हिंसेच्या वाटेवरून गांधी विचारांच्या मार्गावर…!
गडचिरोलीत ८२ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची 'गांधी विचार प्रचार परीक्षा'; पुनर्वसन प्रक्रियेला नवी दिशा...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
एकेकाळी बंदुकीच्या धाकावर जगणाऱ्या हातांनी आज गांधी विचारांची उत्तरपत्रिका लिहिली; हिंसेवर शांततेचा, भीतीवर विश्वासाचा आणि संघर्षावर संविधानाचा विजय नोंदविणाऱ्या या उपक्रमाने गडचिरोलीच्या पुनर्वसन प्रक्रियेत एक नवा आणि आशादायी अध्याय लिहिला आहे.
गडचिरोली : एकेकाळी हातात बंदूक घेऊन हिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या ८२ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या हातात रविवारी गांधी विचारांचे पुस्तक आणि उत्तरपत्रिका दिसली. सत्य, अहिंसा, संविधान आणि लोकशाही मूल्यांचा स्वीकार करून समाजाच्या मुख्य प्रवाहात नव्या आयुष्याची वाटचाल करण्याचा निर्धार या परीक्षेच्या माध्यमातून व्यक्त झाला. गडचिरोली पोलीस दल, आदर्श मित्र मंडळ (पुणे), श्री लक्ष्मीनृसिंह पतसंस्था (बल्लारपूर) आणि सर्वोदय मंडळ (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘गांधी विचार प्रचार परीक्षा’ ही पुनर्वसनाच्या प्रक्रियेला नवी दिशा देणारी आणि राज्यासाठी आदर्श ठरणारी अभिनव संकल्पना ठरली.
परीक्षेपूर्वी सहभागी सदस्यांसाठी आठ दिवसांचे विशेष गांधी विचार अध्ययन शिबिर आयोजित करण्यात आले. महात्मा गांधी यांचे जीवनकार्य, सत्य, अहिंसा, भारतीय संविधान, लोकशाही, सामाजिक सलोखा आणि जबाबदार नागरिकत्व या विषयांवरील साहित्याचा अभ्यास करून घेण्यात आला. त्यानंतर चार दिवस संवादात्मक सत्रांद्वारे सहभागी सदस्यांच्या मनातील शंका, संभ्रम आणि प्रश्नांचे सविस्तर निरसन करण्यात आले. या मुक्त संवादातून हिंसेचा मार्ग सोडून शांततामय, सन्मानपूर्वक आणि स्वावलंबी जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

गडचिरोली पोलीस दल गेल्या काही वर्षांपासून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनासाठी शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार, आरोग्य आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या विविध योजना सातत्याने राबवत आहे. ‘गांधी विचार प्रचार परीक्षा’ हा त्या प्रयत्नांमधील आणखी एक महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक टप्पा मानला जात आहे. या उपक्रमातून पुनर्वसन ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून मानसिक, वैचारिक आणि सामाजिक परिवर्तनाची व्यापक चळवळ असल्याचा संदेश देण्यात आला.
परीक्षेतील गुणवंतांना प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय ७ हजार ५०० रुपये आणि तृतीय ५ हजार रुपये अशी रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. याशिवाय २५ आत्मसमर्पित सदस्यांना प्रत्येकी २ हजार रुपये प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला. सर्व सहभागी सदस्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले, तर आत्मसमर्पित महिला बचत गटांना मान्यवरांच्या हस्ते आर्थिक सहाय्याचे धनादेश वितरित करण्यात आले.
यावेळी आदर्श मित्र मंडळ, पुणेचे उदय जगताप यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “भूतकाळातील हिंसा मागे सोडून सकारात्मक विचार, शिक्षण आणि स्वावलंबनाच्या बळावर नवीन आयुष्य उभारणे हीच खरी विजयाची वाट आहे. मुख्य प्रवाहात येण्यासाठी आणि सन्मानाने जगण्यासाठी आम्ही गडचिरोली पोलिसांच्या सहकार्याने कायम तुमच्या पाठीशी उभे राहू.”
या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील ऊईके, आदर्श मित्र मंडळ, पुणेचे उदय जगताप, श्री लक्ष्मीनृसिंह पतसंस्था, बल्लारपूरचे श्रीनिवास सुंचूवार तसेच सर्वोदय मंडळ, मुंबईचे लक्ष्मण गोळे उपस्थित होते.
या अभिनव उपक्रमाची संकल्पना आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप, आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल आणि श्रीनिवास सुंचूवार यांनी साकारली.

