Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कुरखेडा पोलिसांनी शोधले ११ हरवलेले मोबाईल; दोन लाखांचा ऐवज मालकांच्या हाती सुपूर्द

सायबर तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने गडचिरोली पोलिसांचे यश; हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांत समाधान...

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : मोबाईल फोन हा आज प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. अशा परिस्थितीत मोबाईल हरवणे किंवा चोरीला जाणे म्हणजे केवळ आर्थिक नुकसान नसून वैयक्तिक माहिती, बँकिंग व्यवहार आणि डिजिटल ओळख धोक्यात येण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर कुरखेडा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण तपासाच्या बळावर हरवलेले व चोरीस गेलेले तब्बल ११ मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मोबाईल चोरी व सायबर गुन्ह्यांबाबत विशेष दक्षता घेतली जात आहे. त्यानुसार कुरखेडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या हरवलेल्या व चोरीच्या मोबाईल संदर्भातील तक्रारींचा तांत्रिक पद्धतीने तपास करण्यात आला. सीईआयआर (CEIR) प्रणालीसह आधुनिक तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करून तपास पथकाने विविध ठिकाणांहून एकूण ११ मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळविले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शोधून काढलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे दोन लाख रुपये इतकी असून, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १० जुलै २०२६ रोजी कुरखेडा पोलीस ठाण्यात संबंधित नागरिकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी गडचिरोली पोलिसांप्रती समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले.

गडचिरोली पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यास वेळ न दवडता जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तसेच CEIR पोर्टलवरही तक्रार नोंदवून सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तात्काळ तक्रार केल्यास मोबाईलचा गैरवापर रोखण्यास आणि तो शोधून काढण्यास मोठी मदत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव तसेच पोलीस अंमलदार पंकज नवघरे आणि तपास पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.