Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्ह्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कलम 36 लागू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चंद्रपूर, दि. ५ ऑक्टोबर : जिल्ह्यात 26 सप्टेंबर 2022 पासून नवरात्र उत्सवास सुरुवात झाली आहे. दरम्यान दसरा, धम्मचक्र प्रवर्तन दिन, रावण दहन, शस्त्रपुजन व इतर कार्यक्रम राहत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दि.28 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022 चे रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविण्याबाबत, सभेचे आयोजन व मिरवणूक काढण्याबाबत, त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊडस्पीकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी व त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे आहेत अधिकार :

मिरवणूक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पुजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणुकीस निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजास्थळी लोकांच्या वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे इत्यादी निर्बंध घालण्याचे अधिकार, रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लाऊड स्पीकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, तसेच कलम 33, 35 ते 40 व 45 मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सदर आदेश लागू असतांना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजवणे, लाऊडस्पीकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी. सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सदर आदेश दि. 28 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजतापासून ते दि. 10 ऑक्टोंबर 2022 च्या रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीपर्यंत अंमलात राहील. असे पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

हे देखील वाचा : 

घरगुती भांडणाचे पर्यवसान बायकोच्या खुनात.

मेट्रोच्या साईडवर मजुराचा पडून मृत्यू .

 

Comments are closed.