माओवादाच्या नावाने दहशतीचा बनाव उधळला; पोलीस मदत केद्र – फुलणार प्रकरणी सहा जणांना अटक
'ऑपरेशन अंतिम प्रहार'नंतर अफवांच्या आधारे भीती पसरविण्याचा डावही हाणून पाडला; नक्षल सप्ताहात नागरिकांनी भूलथापांना बळी पडू नये, पोलिसांचे आवाहन...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलवादाच्या सावटातून बाहेर पडलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा माओवादाच्या नावाने भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न गडचिरोली पोलिसांनी हाणून पाडला आहे. भामरागड तालुक्यातील पोलीस मदत केद्र-फुलणार परिसरात माओवादी असल्याचे भासवत बॅनर व पत्रके लावून नागरिकांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पिपली बुर्गी परिसरातील अशाच प्रकारच्या प्रकरणातील कारवाईनंतर अल्पावधीतच झालेली ही दुसरी मोठी कारवाई असून, माओवादाच्या नावाखाली समाजात भीती निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश गडचिरोली पोलिसांनी दिला आहे.
गेल्या काही वर्षांत गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या सातत्यपूर्ण नक्षलविरोधी मोहिमा, जनसहभाग आणि ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील माओवादी चळवळीचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आणले आहे. अशा परिस्थितीत काही समाजकंटकांनी माओवादी असल्याचा बनाव करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस यंत्रणा तातडीने सक्रिय झाली.
२५ जुलै रोजी पोलीस मदत केद्र-फुलणारपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावरील हिद्दुर-दोबुर मार्गावर दोन झाडांमध्ये लाल रंगाचा कापडी बॅनर आणि पांढऱ्या रंगाचे पत्रक आढळून आले. त्यावरील मजकूर माओवादी संघटनेच्या नावाने लिहिलेला असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तो लावण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांत या प्रकरणाचा छडा लावला. जोगा रैनू धुर्वा, मालू कांडे धुर्वा, दलसू मर्रा तेलामी, चैतू डुंगा धुर्वा, गणेश देवू आलामी आणि राजेश दल्लू वड्डे या सहा आरोपींना अटक करण्यात आली. नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी त्यांनी माओवादी असल्याचे भासवत बॅनर व पत्रके लावल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
या घटनेप्रकरणी कोठी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायदा (UAPA) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईनंतर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर माओवादाच्या नावाने पसरविण्यात येणाऱ्या अफवा, पत्रके किंवा कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये. संशयास्पद हालचाली अथवा माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी. समाजात भीती व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही कायद्याची कठोर कारवाई टाळता येणार नाही.
नक्षलवादमुक्त गडचिरोलीची प्रतिमा कायम राखण्यासाठी पोलीस दलाने सुरू केलेल्या मोहिमेला स्थानिक नागरिकांचेही सहकार्य लाभत आहे. त्यामुळे माओवादाच्या नावाखाली दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने उधळून लावले जात असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

