अबूझमाडच्या जंगलात नक्षलवाद्यांचे ‘खजिने’ उद्ध्वस्त; कोटींची रोकड, एके-४७सह शस्त्रसाठा जप्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली/नारायणपूर : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतच्या अतिदुर्गम अबूझमाड जंगलात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांच्या आर्थिक आणि लष्करी जाळ्यावर जबरदस्त घाव घातला आहे. जमिनीत पुरून ठेवलेली तब्बल १ कोटी १ लाख ६४ हजार रुपयांची रोकड, एके-४७ रायफल्ससह मोठ्या प्रमाणातील शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य सुरक्षा दलांच्या हाती लागल्याने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरक्षा वर्तुळात आहे.
नारायणपूर जिल्ह्यातील अतिसंवेदनशील आणि नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अबूझमाड परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून सुरक्षा दलांचे व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. गावकरी आणि गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नारायणपूर पोलीस, डीआरजी, एसटीएफ, आयटीबीपी आणि बीएसएफच्या संयुक्त पथकाने जंगलातील संशयित ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले.
या कारवाईदरम्यान जमिनीखाली अत्यंत गुप्तपणे लपवून ठेवलेला रोकड आणि आधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा उघडकीस आला. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या प्रभावक्षेत्रात थेट प्रवेश करून मोहीम यशस्वी केल्याने संघटनेच्या हालचालींना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जप्त करण्यात आलेली कोट्यवधींची रोकड ही खंडणी, अवैध वसुली आणि जंगल परिसरातील विविध आर्थिक व्यवहारांतून जमा करण्यात आल्याचा संशय आहे. ही रक्कम नव्या भरती, शस्त्रखरेदी, संघटन विस्तार आणि मोठ्या हिंसक कारवायांसाठी वापरण्याचा नक्षलवाद्यांचा मानस असल्याचा अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
कारवाईत सुरक्षा दलांनी ३ एके-४७ रायफल्स, ३ एसएलआर रायफल्स, १३२ बीजीएल सेल्स, ३०३ आणि ३१५ बोर रायफल्स, १२ बोर बंदुका, देशी कट्टे, मोठ्या प्रमाणावर जिवंत काडतुसे, इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स, कॉर्डेक्स वायर, वॉकी-टॉकी संच आणि अन्य स्फोटक साहित्य जप्त केले. या साठ्याचा वापर भविष्यात सुरक्षा दलांवर मोठे हल्ले घडवून आणण्यासाठी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांत नक्षलविरोधी कारवाया अधिक तीव्र झाल्याने अबूझमाड परिसरातील नक्षल संघटनांवर सातत्याने दबाव वाढत आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा दलांच्या या कारवाईकडे नक्षल चळवळीच्या आर्थिक कणा मोडणारी मोठी कारवाई म्हणून पाहिले जात आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर अबूझमाड परिसरात शोधमोहीम आणखी तीव्र करण्यात आली असून, जंगल परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा साहित्य आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी यांनी नागरिकांना केले आहे.

