Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! उपचाराअभावी कोरोनाबाधिताचा रुग्णालयाच्या दारातच दुर्दैवी मृत्यू; तब्बल ५ तास मृतदेह जागीच पडून

  • रुग्णवाहिका न मिळाल्याने घंटागाडीतून नेला मृतदेह.
  • उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथील दुर्दैवी घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद, दि. ४ मे:  जिल्ह्यातील तेर गावात अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे. एका कोरोनाबाधित रुग्णांचा उपचाराअभावी रुग्णालयाच्या दारातच मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्यूनंतर जवळपास पाच तास हा मृतदेह रुग्णालयाच्या दारातच पडून होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तालुक्यातील किणी येथील छगन सोनटक्के (६५) हे सोमवारी सकाळी साडेदहा वाजता तेर येथील एका खासगी डॉक्टरकडे तपासणीसाठी गेले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याने ताबडतोब उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तेथून बाहेर पडतानाच छगन सोनटक्के पायरीजवळ पडले ते निपचितच. कोरोनाचा संसर्ग असण्याची शक्यता असल्याने त्यांच्या जवळपासही कोणी फिरकायला तयार नव्हते. ही बाब तातडीने पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी तेर येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यास बोलावून रॅपिड टेस्ट करायला लावली. त्यात छगन सोनटक्के हे बाधित आढळून आले. त्यानंतर मृतदेह पॅक करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयास कळविण्यात आले; मात्र हा प्रकार रुग्णालयाबाहेर घडल्याने मदत करता येणार नाही, अशी भूमिका सुरुवातीला घेण्यात आली होती; मात्र नंतर मयताचा एक नातेवाईक व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हा मृतदेह पॅक केला.

यानंतर हा मृतदेह कोणाच्या ताब्यात द्यायचा यावरुन चर्वण सुरु झाले. सुरुवातीला किणी ग्रामपंचायतीनेही मृतदेह न्यायला नकार दिला. मग तेर ग्रामपंचायतीनेही ही जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थतता दर्शविली. नातेवाईकांनी एखादे वाहन दिल्यास आपणच मृतदेह नेऊ, अशी भूमिका मांडली. तेव्हा किणीच्या सरपंचांनी पुढाकार घेऊन मृतदेह सर्व खबरदारी घेत गावाकडे नेला. मात्र, तोपर्यंत जवळपास पाच तास उलटून गेले होते. सायंकाळी या मृतदेहावर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, कोरोना बाधितांच्या मृत्यूनंतरही त्यांची कशी अवहेलना होत आहे, याचा प्रत्यय या घटनेने सोमवारी आणून दिला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.