Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विषारी चारा खाल्ल्याने 18 बकऱ्यांचा मृत्यू

अहेरी तालुक्यातील बोरी जंगल परिसरातील घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बोरी/लगाम 10 सप्टेंबर :-  बोरी परिसरातील बकऱ्या जंगलात चरण्यासाठी गेले असता, विषारी चारा खाल्ल्याने अठरा बकऱ्या दगावल्याने गावात खळबळ उडाली. 8 सप्टेंबरच्या सकाळी नेहमीप्रमाणे बोरी परिसरातील बक-या चारणारा महादेव मोहुर्ले हा गावक-याच्या बकऱ्या घेऊन जंगलात चरण्यासाठी गेला असता, कक्ष क्र. 592 मधील वन तलावाजवळ बकऱ्या अचानक चक्कर येऊन खाली पडत होत्या. काय झाले काय नाही याला काही कळाले नाही. महादेवने गावाकडे धाव घेऊन बकऱ्या मरत आहेत. धावा धावा अशी आरडाओरड केली. त्यात गावकऱ्यांनी जंगलाचे दिशेने जाऊन बघताच बकऱ्या मृत्यूमुखी पडल्याचे दिसले. त्याच क्षणी पशुवैद्यकीय विभाग अहेरी यांच्या टीमला पाचारण केले आणि प्राथमिक उपचार म्हणून बोरी येथील खाजगी पशुवैद्यकीय  किशोर आत्राम यांना बोलावून उपचार करण्यास सांगितले.

गावकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन जंगलातून संपूर्ण बकऱ्या गावात आणल्या. उशिरा का होईना पशुवैद्यकीय चमू उपचारासाठी बोरी राजपूर ग्रामपंचायतच्या परिसरात दाखल झाले. आणि कशालाही वेळ न लावता त्यांनी उपचार करण्यास सुरुवात केली. डॉक्टरांच्या उपचारामुळे 97 बकऱ्या बचावल्या. डॉक्टर अंकित मत्ते यांनी बकऱ्याचे शव विच्छेदन करून विषारी चाऱ्याने पोटात गॅस होऊन मृत्यू पावल्याचे सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र बोरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या चार वर्षापासून डॉक्टर उपलब्ध नाही. वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा भ्रमणध्वनी वरून वरिष्ठांशी संपर्क केला असता ठीक आहे. डाॅक्टर उपलब्ध करून दिला जाईल,असे सांगितले. शासन व प्रशासन आणि लोकप्रतिनीधी याकडे कानाडोळा करतात. मात्र अजूनही प्रायव्हेट डॉक्टर किशोर आत्राम यांच्या भरवशावर बोरी येथील पशु जगत आहेत. येथे विशेष सरकारी दवाखाना असूनही त्याचा वेळीच उपचार होत नसेल तर काय उपयोग? सध्या स्थितीत जनावरावर मोठे आजार येण्याचे संकेत दिले जात आहेत. तेव्हा या भागातील पशुची जबाबदारी किशोर आत्राम या प्रायव्हेट डॉक्टर वरच राहील का ? असा सवाल जनतेतून करण्यात येत आहे.

अहेरी येथील चमूने, 97 बकऱ्याचे जीव वाचवल्याबद्दल बोरी परिसरातील जनतेने पशुवैद्यकिय चमुचे अभिनंदन केले. मात्र विषारी चारा खाल्ल्याने 18 बकऱ्या दगावल्यामुळे अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. अहेरी येथून आलेल्या पंचायत विस्तार अधिकारी खमनचेरु येथील डॉक्टर अंकित मत्ते, देवलमारीचे पशुधन पर्यवेक्षक राजेश उसेंडी, पशुधन परिचर खमनचेरू किशोर टेकाम, पशुधन परिचर बोरी टी.पी. ठाकूर, आणि प्रायव्हेट डॉक्टर किशोर आत्राम यांनी वेळीच मदत देऊन उर्वरित बकऱ्यांना जीवदान दिले. या पशुवैद्यकीय टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :- 

Comments are closed.