Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अखेर सकारात्मक विचारांनी तीन आठवडे कोरोनाशी झुंज देऊन ‘ती’ परतली सुखरूप घरी

आरमोरी येथील जयश्री सोनकर यांची कहाणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : “दहा दिवस लक्षणं नव्हती, पुन्हा ताप वाढला, धाप लागू लागली. वाटलं आता काही खरं नाही. गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसीयूमध्ये वार्ड क्रमांक पाच मध्ये हालविण्यात झाले. त्या ठिकाणी ऑक्सिजन वर ठेवण्यात आलं. मनात भीतीचे विचार येत होते. परंतु माझ्या नवऱ्याने धीर दिला. डॉक्टरांनी चांगले उपचार केले. मी यातून मनात सकारात्मक विचारांना जवळ केले. दृढनिश्चय केला की मी जिंकणार आणि मी जिंकले. तीन आठवड्यानंतर मी सुखरूप घरी गेले.”

ही कहाणी सांगतात आरमोरी येथील कोरोनातून बऱ्या झालेल्या जयश्री सोनकर.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ही कथा ऐकायला जेवढी चांगली वाटते त्यापेक्षा कितीतरी थरारक स्थिती मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. माझे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले, सिटी स्कोअर अठरावर गेला असतानाही फक्त चांगले विचार डोक्यात ठेवून, न भिता मी सकारात्मक राहिले. जिल्ह्यात एप्रिल मध्ये मृत्यू जास्त झाले होते. अशातच मला 16 एप्रिलला आयसीयू मध्ये ॲडमिट केले. दररोज आजूबाजूला कोणी तरी गेल्याचं कानावर येत होतं. तसेच त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष इतरांचे मृत्यूही पाहत होते. डॉक्टरांची प्रत्येकाचा जीव वाचवण्याची धडपड मी जवळून या काळात पाहिली.

मी काही दिवसापूर्वी मुंबईला वडिलांना पाहण्यासाठी तीन-चार दिवस गेले होते. त्यांच्यावर हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर मी परत आले. आमच्या कॉलेजमध्ये त्यादरम्यान कोविड तपासणी शिबीर सुरू होते. मीही माझी तपासणी करून घेतली आणि माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे कळाले. मला विशेष वाटले, मला कोणतीही लक्षणे नाहीत, कोणताही त्रास नाही तरी माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह कसा काय आला? परंतु मी मुंबईला गेले होते त्यावेळी कदाचित मला संसर्ग झाला असेल. मी लक्षणे नाहीत म्हणून आरमोरी येथे घरी आयसोलेशन मध्ये राहण्याची विनंती केली. औषधे घेतली. आठवडाभरानंतर मला काही प्रमाणात लक्षणे जाणवू लागली. ताप येत जात होता. सेंटरला भेट देऊन मी पुढील औषधे घेतली. परंतु सारखे जाणे-येणे बरोबर नव्हते मी कोविड केंद्रात भरती झाले. त्यांनी आवश्यक तपासण्या करून गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती होण्यासाठी रेफर केले. काळजी वाटत होती. १६ एप्रिलला मी दाखल झाले. त्या ठिकाणी सर्व आवश्यक तपासण्या केल्या. माझे पती अजय सोनकर बरोबर होते. त्यांना बाधा झाली नव्हती परंतु त्यांनी आवश्यक काळजी घेत मला त्या ठिकाणी सहारा दिला. आयसीयूमध्ये ऑक्सिजन वर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले. या ठिकाणी कित्येक रुग्ण येत जात होते. कित्येक मृत्यू मी जवळून त्या पाच दिवसात पाहिले. रुग्णांची स्थिती पाहून असं वाटलं की सर्वजण खूप घाबरलेले आहेत. परंतु अशा वातावरणात ही सकारात्मक विचार ठेवणे, आत्मविश्वास वाढविणे, मनोधैर्य वाढविणे खूप अवघड आहे. परंतु मी ते केलं. बेडवर बसून प्राणायाम करत होते. सकारात्मक व्हिडिओ मोबाईलवर पाहत होते. या दरम्यान कित्येक रुग्णांशी मी याबाबत संवादही साधला. घाबरू नका, चांगला विचार करा, कोरोना आजार बरा होतो. यातून त्यांनाही दिलासा मिळत होता. मी त्या ठिकाणी एक अनुभवलं रुग्णांच्या जवळच्यांनी पाठिंबा देणं खूप गरजेचं असतं. घरातील कोणीतरी त्या ठिकाणी येऊन धीर देत असेल तर बरं वाटतं किंवा किमान मोबाईल वरती तरी जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा बोलून त्या रुग्णाचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे. यातून नक्कीच त्या रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत मिळेल. म्हणतात ना ‘मन निरोगी तर आरोग्य निरोगी’ ते खरंच आहे. शरीराला खाणं पिनं लागते. यादरम्यान जेवण जात नाही परंतु मी ते वेळच्या वेळी केलं. त्यातूनही मला चांगला फायदा झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोविड रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स गेली वर्ष झालं या प्रकारची सेवा देत आहेत. खरच सलाम त्यांना. कारण त्या परिस्थितीमध्ये अखंड सेवा देऊन मानसिकता सकारात्मक ठेवणं किती मोठं काम आहे हे मी त्या ठिकाणी अनुभवलंय. वर्षभर तेच तेच काम करणं, कोरोना रुग्णांच्या अडचणी समजून घेणे, त्यांना उपचार करणं, त्या परिस्थितीत राहणे म्हणजे खूप मोठं काम म्हणावं लागेल. या सर्व अनुभवांवरून मी कोरोना बाधितांना विनम्र आवाहन करते की, घाबरू नका या आजाराला प्रबळ इच्छाशक्तीने जिंकता येतं. सकारात्मक राहा, वेळेवर खा, औषधे घ्या, प्राणायाम योगा करा, घरच्यांशी बोला यातून तुम्हाला नक्की कोरोनावर मात करता येईल. माझा ऑक्सिजन ८० वर गेला होता, स्कोर १८ होता, पाच दिवस ऑक्सिजनवर होते यातून मी सुखरूप बाहेर आले. कारण फक्त सकारात्मक विचारांमुळे. मी बरे होण्यामागे नेहमी धीर देणारे माझे पती अजय सोनकर व दवाखान्यातील सर्व डॉक्टर यांचे मी मनापासून आभार मानते.

Sachin Adsul

  • सचिन अडसूळ,

जिल्हा माहिती अधिकारी गडचिरोली

 

हे देखील वाचा :

Big BREAKING :अनिल देशमुख यांच्याविरोधात आता ईडीने दाखल केला गुन्हा!

राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन तातडीने लस देण्यात यावी – मंत्री छगन भुजबळ

 

Comments are closed.