Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नवोदय परीक्षेमध्ये अहेरी प्रकल्पातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 1 एप्रिल- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये यश मिळवून प्रकल्पाची मान उंचावली आहे. शासकीय आश्रम शाळा बामणी येथील कार्तिक राजाभाऊ तोरेम व अनुदानित आश्रम शाळा लगाम येथील शिवानी अरुण नैताम या विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तत्कालीन प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांच्या संकल्पनेतून शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना शासकीय आश्रम शाळा खमनचेरु येथे एकत्रित करून विशेष मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले.

प्रकल्पातीलच उत्कृष्ट शिक्षकांकडून या सर्व विद्यार्थ्यांचा परीक्षाभिमुख सराव करून घेण्यात आला तसेच स्पर्धा परीक्षेबाबतची माहिती देण्यात आली. सुहास वसावे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) व सूर्यभान डोंगरे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) यांनी सदर मार्गदर्शन वर्गाचा सातत्याने पाठपुरावा केला. तसेच सदर प्रशिक्षणाकरिता डॉ. दीपक वाघाडे, प्रशांत गुरु, दत्तात्रय सूर्यवंशी, खुशाल दिवसे, प्रसाद चिमरालवार, वैभव वैरागडे, देवाजी कस्तुरे, मजहर खान व विनोद मुळावर यांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळेच गडचिरोली जिल्ह्यातून आश्रम शाळेतील दोन अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्रथमताच निवड झालेली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्रकल्प व विभागातील प्रथम घटना
रवींद्र ठाकरे, अप्पर आयुक्त, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षापासून भविष्यवेधी शिक्षण प्रणाली आश्रम शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत झालेली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात गडचिरोली जिल्ह्याच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची नवोदय मध्ये निवड होण्याची पहिलीच घटना आहे. नवोदय प्रवेश पूर्व परीक्षेमध्ये दोन विद्यार्थ्यांची निवड झाल्याने शिक्षकांमध्ये व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. नागपूर विभाग स्तरांवरून शिक्षक व विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन सदर उपक्रम दरवर्षी सुरू ठेवण्याच्या सूचना आदित्य जीवने, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी यांनी दिलेल्या आहेत.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पेरमिली गावातील कन्या क्रिष्टी बंडमवारची जवाहर नवोदय विद्यालयात निवड

 

Comments are closed.