Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिव्यांगांसाठी सरकारला धोरणे ठरवण्यासाठी मदत करणार..दिव्यांगांसाठी झटणाऱ्या संस्थांचा महासंघ स्थापन करणार

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क 

पालघर, 29 एप्रिल- दिव्यांगासाठी काम करणाऱ्या देशभरातील संघटना एकत्र येऊन त्यांचा महासंघ स्थापन करण्याचा निर्णय पालघर येथे झालेल्या या संस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. दिव्यांगांचे जीवन सुकर होण्यासाठी सरकारने राबवायच्या धोरणांवर प्रभाव टाकण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय या संस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.
‘बौद्धिक विकासात्मक अपंगत्व असिस्टेड लिव्हिंग फॅसिलिटी’ या संघाची बैठक पालघर येथे झाली. सध्या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्था गेल्या अनेक वर्षांपासून एकएकट्या काम करतात. त्यांना एकत्र आणून दिव्यांगांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी या संघटना एकत्र येऊन त्यांचा महासंघ स्थापन करण्याचे या वेळी ठरले.

दिव्यांगांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणार
दिव्यांगांचे जीवन सुकर व्हावे, त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचवावा या व अन्य बाबींसाठी या संघटनांनी एकत्र येऊन त्यावर विचारविनिमय केला. बौद्धिक आणि विकासात्मक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सामान्य लोकांपेक्षा वेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना रॅम व अन्य सुविधांची गरज असते. अशा पार्श्वभूमीवर या व्यक्तींचे जगणे अधिक सुसह्य कसे होईल आणि त्यासाठी शासन स्तरावर कोणती धोरणात्मक पावले उचलता येतील, यावर पश्चिम विभागीय बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पश्चिम भारताची बैठक पालघरला
यापूर्वी अशा संस्थांची बैठक दक्षिण आणि उत्तर भारतात झाली होती, तर आता तिसरी बैठक पश्चिम भारत विभागात पालघरला झाली. दिव्यांग व्यक्तींना सामाजिक आणि शैक्षणिक विलगीकरण, विषय शिक्षणाचा अभाव, व्यावसायिक कौशल्य विकास आदी प्रकरणात दिलासा मिळावा असा प्रयत्न करण्याचे ठरले. कुटुंबात दिव्यांग किंवा सेलेबल पाल्सी रुग्ण असल्यानंतर कुटुंबाची ओढाताण होते. आपल्या नंतर काय अशी चिंता या कुटुंबाला लागून असते. अशा दिव्यांगांचा सांभाळ करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था पुढे आल्या आहेत.

संस्थांसाठी नियमावली तयार करणार
या संस्थांना सरकारकडून काही प्रमाणात मदत मिळत असते. काही संस्था स्वबळावर असे काम करत असतात. अशा संस्थांसाठी एक नियमावली तयार करून सरकारची अधिकाधिक मदत कशी मिळवता येईल आणि अशा संस्थांमध्ये दिव्यांगांच्या हाताला काम देऊन त्यांना रोजगार कसा देता येईल, यावर या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला. कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊनही काही कामे सुरू केली, तरी त्यातून संस्थांचा खर्च भागणारा नाही; परंतु बौद्धिक विकास कमी असलेल्यांनाही कामात गुंतवून ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी अशा कौशल्यपूर्ण प्रशिक्षणाची आणि स्वयंनिर्मित वस्तूंच्या उत्पादनाची गरज असते. त्यावर या बैठकीत सर्व संस्थाचालकांनी आपापली मते मांडून एक सर्वंकष धोरण ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सर्वंकष धोरणाची गरज
अशा व्यक्तींच्या कुटुंबांना आयुष्यभर आधार आणि विश्रांतीची परिसंस्था तयार करण्यासाठी बौद्धिक आणि विकासात्मक अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या समर्थनात अनेक उपक्रमामध्ये सहाय्यक जगणे महत्त्वाचे आहे. अशा जवळजवळ सर्व सहाय्यक आवास सुविधा या व्यक्तींच्या पालकांच्या सहकार्याने पुरवण्यावर भर असला, तरी हे क्षेत्र अद्यापही प्राथमिक अवस्थेत आहे. त्यासाठी स्पष्ट रचना, धोरणात्मक निर्णय आणि दिशा आवश्यक आहे.

समान मानके आणि स्वयंशासनावर भर
‘असिस्टेड लिव्हिंग फॉर ऑर्टीस्टिक पर्सेस’ या संस्थेच्या संस्थापक नीना वाघ यांच्या पुढाकाराने देशभरातील सहाय्यक आवास सुविधा चालक मालकांचा एक गट एकत्र येऊन किमान समान मानके आणि स्वयंशासन यावर लक्ष केंद्रित करणारी संघटना स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला पालघर येथील सानिधानम् या संस्थेचे संस्थापक सुमित कटारिया, संगीता जगतियांनी, शोभा सचदेव आदी उपस्थित होते

‘देशभरातील दिव्यांगांच्या संघटनांनी एकत्र येऊन दिव्यांगांचे जगणे अधिक सुसह्य करून त्यांच्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे आणि सरकारला काही निर्णय घेण्यास भाग पाडणे, यासाठी देशभरातील अशा संस्थांची बैठक पालघरला झाली. त्यातून निश्चितच काही ठोस निर्णय झाले असून सरकार दरबारी हे विषय मांडून दिव्यांगांचे जगणे अधिक सुसह्य करण्याचा प्रयत्न असल्याच सुमित कटारिया यांनी सांगितले.

Comments are closed.