Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिमोल्लंघनानंतर अजितदादा पवार यांचा झंझावाती राज्यव्यापी दौरा

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती...

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, 10 ऑक्टोंबर : दसर्‍याच्या सिमोल्लंघनानंतर पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी झंझावाती दौरा सुरू करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना आज दिली.पक्षातंर्गत बैठकीसाठी आज प्रदेश कार्यालयात आले असता सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या विचारांचा पगडा प्रभावीपणे आमच्यावर आहे. ज्या विचारधारेतून सुसंस्कृत महाराष्ट्र घडला तीच विचारधारा घेऊन अनेक वर्षे काम करत आहोत. आज सत्तेत जाऊन शंभर दिवस होत असताना अजितदादा पवार यांनी भावनिक साद घातली आहे, भावनिक पत्र लिहिले आहे त्या ‘सादेला’ त्या ‘पत्राला’ जनता नक्कीच प्रतिसाद देईल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यशवंतराव चव्हाणसाहेबांचे राजकारण पाहिले तर भाषा, प्रांतरचना झाल्यावर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदान आणि १९८४ पर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास देशपातळीवर महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला. एकमेव नेते आहेत ज्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री पद अत्यंत सक्षमपणे सांभाळले. १९६२ च्या युध्दाच्यावेळी पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना दिल्लीत बोलावले. त्यावेळी ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’ असे वर्णन केले गेले होते. मात्र त्यांनी जी भूमिका मांडली तो कालखंड एकपक्षीय राजवटीचा होता. त्यानंतर राज्यात आघाडी सरकारची अपरिहार्यता आली. जो विचार चव्हाणसाहेबांनी मांडला तो त्यावेळच्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने होता.

मात्र १९८९ सालापासून या देशात एकेकाळचा बिगर कॉंग्रेस व इतर पक्ष एकत्र यायचे त्यानंतर बिगर भाजपा ‘एनडीए’ नावाने एकत्र येतात. यातील अनेक पक्षांची राजकीय आयडीयालॉजी पूर्णपणे भिन्न आहे, विरोधाभासाची आहे. त्या पक्षांनीसुध्दा वेगवेगळ्या राजकीय पक्षांना पाठिंबा दिल्याचे पहायला मिळाले. १९८९ मध्ये दोन सरकारे आली. १९९१ मध्ये नरसिंहरावांचे सरकार आले त्यावेळीसुध्दा नरसिंहरावांच्या सरकारला पाठिंबा देताना मूळ कॉंग्रेसच्या विचारधारेच्या टोकाच्या विरोधात असलेल्या पक्षांनीसुध्दा नरसिंहरावांना पाठिंबा दिला होता. ९६, ९८, ९९ या तीन कालावधीत तीन निवडणूका झाल्या त्यावेळी वेगवेगळी सरकारे आली त्यावेळी भिन्न विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. १९७८ साली पुलोद स्थापन झाले त्यावेळीसुध्दा हशु अडवाणी, उत्तमराव पाटील त्या सरकारमध्ये होते. परंतु आज जो दावा केला जात आहे तो केवळ चव्हाणसाहेबांचा विचार पुढे घेऊन जे मत अजितदादांनी व्यक्त केले आहे त्या मताला केवळ तांत्रिक अर्थाने छेद देण्याचा प्रयत्न केला जात आहे असे स्पष्ट मत सुनिल तटकरे यांनी अनेक दाखले देत मांडले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या विचारधारेवरच वर्षानुवर्षे आम्ही काम करत आलो आणि पुढेही करत राहू असे सांगतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात एकपक्षीय राजवट नाहीय. महाराष्ट्राच्या राजकारणात आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे. तसे असेल तर आम्ही २०१९ मध्ये कुठल्या विचाराने शिवसेनेसोबत युती केली त्याचे उत्तर काय आहे. त्यांच्यासोबत युती करत असताना कुठला विचार आम्ही स्वीकारला होता याचे उत्तरही द्यावे असे थेट आव्हान सुनिल तटकरे यांनी विरोधकांना दिले आहे.

अजितदादा पवार यांनी आज जे पत्र लिहिले ते स्वयंस्पष्ट आहे. त्यात राजकीय अनिवार्थ त्यांना जो काढायचा असेल तर त्यांना तो काढता येऊ शकतो. आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता ज्यावेळी येत असते त्यावेळी असे घडत असते. कधी स्वप्नातही वाटू शकते का कॉंग्रेसच्या लोकांनी मला सांगावे किंवा उत्तर द्यावे… सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्ष उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला नुसता पाठिंबा नव्हेच तर त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मदत करु शकतो आणि सरकारमध्ये सहभागी होऊ शकतो हे कुठल्या राजकीय विचारधारेमध्ये बसते याचे उत्तर दिले तर आमच्या ज्ञानात भर पडेल असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला.

 

Comments are closed.