Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दारू व तंबाखूमुक्त मार्कंडा यात्रा

२०१६ पासून हि यात्रा दारू व तंबाखूमुक्त अशी समन्वयातून साजरी होत आहे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

चामोर्शी  21 फेब्रुवारी :- विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या मार्कंडा येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते. विदर्भ तसेच आंध्रप्रदेश, तेलंगना, मध्यप्रदेश या राज्यातून मोठ्या संख्येत भाविक दर्शनाला याठिकाणी येतात. कोणतीही यात्रा म्हंटली की, कपडे, खेळणी, खाण्याचे पदार्थ, विविध वस्तू इत्यादीचे दुकाने असतातच. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे, स.न. २०१६ पासून हि यात्रा दारू व तंबाखूमुक्त अशी समन्वयातून साजरी होत आहे. दुकानाच्या या रांगेत खर्रा तंबाखू विक्रीचे कोणतेच दुकान लागलेले दिसत नाही. मुक्तिपथ अभियान, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, मंदिर समिती, ग्रामपंचायत प्रशासन या सर्वाच्या सहकार्यातून हे केले जाते.

सुगंधित तंबाखू पासून बनवला जाणारा खर्रा हा विदर्भात प्रसिद्ध आहे. आरोग्यावर याचा मोठा दुष्परिणाम होतो. याचे सेवन कमी व्हावे, या हेतूने मुक्तिपथ अभियान व प्रशासनाच्या द्वारे दरवर्षी हि यात्रा दारू व तंबाखूमुक्त साजरी केली जाते. यात्रा परिसरात लागणाऱ्या दुकानात कोणत्या प्रकारे तंबाखूजन्य पदार्थ, खर्रा विक्री केली जाणार नाही यासाठी दरवर्षी प्रमाणे प्रशासनाच्या वतीने कडक सूचना यावेळीही दिल्या गेल्या. तसेच गावातील स्थानिक पानठेले या काळात पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असून खेळणी, फळे, पूजेचे साहित्य किंवा इतर दुकान त्यांनी लावलेले आहे. यात्रा परिसरात कुणीही तंबाखूचे सेवन करू नये यासाठी मुक्तिपथ अभियानाचे स्वयंसेवक प्रवेश कठड्याजवळ भाविकांना आवाहन करून त्यांच्या जवळ असलेले, खर्रा, तंबाखू, बिडी सिगारेट एका पेटीत टाकण्याचे आवाहन करत आहे. अनेक भाविक स्वत:हून हे पदार्थ या पेटीत टाकत आहे. स्वयंसेवकांना पोलीस विभागाचे सहकार्य सुद्धा लाभत आहे. या सहा-ते सात दिवसात जमा झालेल्या तंबाखू पदार्थांची शेवटच्या दिवसी होळी करून या पदार्थाला नष्ट केले जाणार आहे. काही अपवादात्मक शौकिनाकडून खिशात एखादी दारूची बाटली सुद्धा आणलेली मिळाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यात्रेत सकाळी व सायंकाळी स्वयंसेवकांकडून जाणीवजागृतीची रॅली व इतरवेळी दिवस भर दुकानात कुणी चोरून लपून तंबाखू पदार्थ विकत आहेत का, याची तपासणी स्वयंसेवकांद्वारे केली जाते. रॅली दरम्यान वापरल्या जात असलेला हाड्यांच्या सापळ्यांचा पोशाख विशेष आकर्षण ठरत असून खर्रा खाल्ला तर शरीराचा असा सापळा होतो हा संदेश याद्वारे दिला जात आहे. आवश्यक ठिकाणी पोलीस प्रशासनाची सुद्धा मदत घेतली जात आहे. जाणीव जागृती करिता मंदिर परिसरात जाणीवजागृतीचे फलक लावण्यात आले आहे. यामध्ये, “खर्रा विष आहे, खाऊ नका देवू नका” यात्रा तंबाखूबंदी कायद्याचे फलक, “यात्रा दारू व तंबाखूमुक्त करण्यास सहकार्य करा” इत्यादी विविध फलक मुख्य ठिकाणी लावण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“खर्रा विष आहे” हे कागदी बिल्ले स्वयंसेवक यात्रेकरुच्या इच्छेनुसार त्यांच्या खिशाला लावून खर्रा खाऊ नका असा संदेश सार्वत्रिक पोहचवत आहे. मार्कंडा यात्रेतील दुकानदाराच्या खिशाला हे बिल्ले लावून दुकानात येणाऱ्या व्यक्तीपर्यंत “खर्रा विष आहे” हा संदेश दिला जात आहे. या सर्व कृतीचे फलित म्हणून यात्रेत येणाऱ्या अनेकांना हे अगोदरच माहित असते की, इथे खर्रा मिळत नाही. खर्रा चघळनारे तोंड अपवादात्मकच दिसून येतात व सर्वात विशेष म्हणजे संपूर्ण यात्रा परिसरात खर्रा पन्नी क्वचित एखादी दुसरी सोडली तर इतर ठिकाणी दिसून येत नाही, हे यात्रा खर्रा मुक्त होण्याचे मोठे निकष आहे व यश आहे. हा महत्वाचा व आवश्यक असा उपक्रम मुक्तिपथ द्वारा केला जात आहे, अशा भावना, मनोगत भाविक व्यक्त करत आहे. या कार्याला जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी  गिल्डा सर चामोर्शी तालुका प्रशासनाचे उपविभागीय दंडाधिकारी तोडसाम सर, तहसीलदार संजय नागटिळक, मार्कंडा ग्राम पंचायत, मंदिर समिती यांनी विशेष सहकार्य केले आहे. मुक्तिपथ अभियान कार्यकर्ते यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.
हे पण वाचा :-
https://youtube.com/shorts/X9ltahV3JI8?feature=share
https://youtu.be/hHnVgynppTI

Comments are closed.