धनंजय मुंडें यांच्या राजीनाम्यासाठी भाजप महिला आघाडी आक्रमक
मुंबई डेस्क, दि. १३ जानेवारी: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडेंविरोधात एका तरुणीने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याचं कबूल केलं आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे.
“सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजप महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल” असे पत्र उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
Comments are closed.