Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मीरा भाईंदर महापालिकेच्या दोन कार्यकारी अभियंत्यासह कंत्राटदारावर कांदळवनाचा ऱ्हासप्रकरणी गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मीरारोड, ३१ मार्च: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि कायदे – नियमांचे उल्लंघन मीरा भाईंदर महापालिके कडून सातत्याने सुरूच आहे. कांदळवन क्षेत्रात बेकायदेशीरपणे जमीन मालकांना टीडीआर मिळावा म्हणून कोट्यावधी रुपयांच्या नाल्यांचे कंत्राट दिल्याच्या तक्रारीवरून पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित व सुरेश वाकोडे सह ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पावसाळी पाण्याचा निचरा होण्याच्या नावाखाली महापालिकेने शहरात २२ नाल्यांचे तब्बल ९५ कोटींचे बांधकामाचे कंत्राट एकट्या  मे. आर अँड बी इन्फ्रास्ट्रक्चर ह्या ठेकेदारास पालिकेने दिले आहे. सदर ठेकेदाराच्या काम निकृष्ठ असल्याच्या तक्रारी असतानाच काही ठिकाणी उपकंत्राटदार काम करत असल्याचे आरोप आहेत. तर कांदळवनात नाल्यांची बांधकामे केल्याने ती थांबवून गुन्हा दाखल करण्याची मागणी सातत्याने होत होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मीरारोडच्या नेमिनाथ हाईट्स व हाटकेश येथील पाण्याच्या टाकी मागील परिसरात कांदळवन क्षेत्रात महापालिकेने दोन नाल्यांचे बांधकाम चालवले होते. नेमिनाथ हाईट्स मागील नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बंद करून पालिकेने आणखी एक नाला बांधण्यास घेतला होता. सदर ठिकाणी कोणताच नाला नव्हता. तर पाण्याच्या टाकी मागील नाला सुद्धा मूळ नैसर्गिक नाला खुला करून घोडबंदर खाडीला न जोडताच हा प्रकार पालिकेने चालवला होता. ठेकेदारांना आर्थिक फायदा करून देण्यासह जमीन मालकांना टीडीआर तसेच आजूबाजूच्या विकासकामांना फायदा करून देण्यासाठी पालिकेने हा घाट घातल्याच्या तक्रारी पर्यावरण व सामाजिक कार्यकर्ते धीरज यांनी चालवल्या होत्या. 

या प्रकरणी स्थानिक जागरूक नागरिक असलेल्या रुपाली श्रीवास्तव यांनी सुद्धा तक्रारी केल्या होत्या. मीरा भाईंदर स्तरावरील कांदळवन समितीने ह्या दोन्ही परिसराची पाहणी करून कांदळवन क्षेत्राचा ऱ्हास व उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून पालिकेने भराव व बांधकाम केल्याचा अहवाल दिला होता. समितीच्या पाहणी वेळी पालिकेचे अधिकारी नरेंद्र चव्हाण सुद्धा उपस्थित होते आणि त्यांना दोन्ही कामे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तरी सुद्धा महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. विजय राठोड सह शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता दीपक खांबित व सुरेश वाकोडे, कनिष्ठ अभियंता चेतन म्हात्रे व ठेकेदार यांनी नाल्यांचे बेकायदेशीर बांधकाम सुरूच ठेवले. पोलिसांनी अनेकवेळा काम बंद करून सुद्धा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पालिकेने काम चालवले.

वन विभागासह समितीच्या अहवाला नंतर अखेर अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांच्या मंजुरी नंतर मंडळ अधिकारी प्रशांत कापडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मीरारोड पोलिसांनी खांबित व वाकोडे, ठेकेदार, संबंधित अधिकारी आणि वाहन यंत्र साहित्याचे चालक- मालक आदींवर पर्यावरण संरक्षण कायद्या खाली गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे महापालिका अधिकारी व ठेकेदार यांच्या या आधी सुद्धा पर्यावरण ऱ्हासाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तर अनेक तक्रारी अजूनही प्रलंबित आहेत.

Comments are closed.