Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लसीकरण व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधून कोरोना संसर्ग टाळणे शक्य – राज्यमंत्री यड्रावकर

गडचिरोली जिल्हा मुख्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली, दि. १ मे : जिल्हयातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे तसेच प्रशासनाने रूग्णाच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध घेवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, यातूनच आपण कोरोना संसर्ग टाळू शकतो असे प्रतिपादन राज्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटिल यड्रावकर यांनी केले. आज गडचिरोली जिल्हा मुख्यालयी त्यांचे हस्ते महाराष्ट्र दिन ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपाध्यक्ष मनोहर पोरेटी पाटिल, अतिरीक्त पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरीक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटिल, निवासी उपजिल्हाधिकारी तळपाडे उपस्थित होते. यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जनतेला उद्देशून राज्यमंत्री यांनी संदेश दिला. कोरोना, जिल्हयातील वाढलेल्या आरोग्य सुविधा, शासनाने केलेल्या विविध उपाय योजनांसह आधुनिक शेती, मनरेगामधील कार्य व पोलीस दलाचे नक्षलविरोधी अभियान याबाबत राज्यमंत्री यांनी आपल्या भाषणात मुद्दे मांडले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी सर्व नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, जिल्हयातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले आज संपुर्ण महाराष्ट्र कोरोना सारख्या एका वेगळया महामारीशी लढत आहे. यासाठी प्रत्येकजण आपापले योगदान देत आहेच. कोणी दवाखान्यात, कोणी रस्त्यावर तर कोणी घरात राहून. कोरोना महामारीसाठी महाराष्ट्र पुन्हा लढतोय. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येवून प्रतिज्ञा करूया. तसेच या कोरोना लढ्यात दिवस रात्र काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना सलाम करूया.

जिल्हयात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची निर्मिती झाली : राज्यमंत्री म्हणाले कोरोना काळात जिल्हयात अनेक प्रकारे आरोग्य विषयक सोयी सुविधा निर्माण केल्या जात आहेत. गडचिरोली जिल्हा आदिवासी, दुर्गम व नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा या जिल्हयात आरोग्य सुविधांबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जात. सद्या या प्रश्नावर प्रशासनाने मार्ग काढून जिल्हा रूग्णालयापासून ते ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा उभारण्याचे कार्य हाती घेतले आहे. आयसीयू, शस्त्रक्रीया विभागाचे लोकार्पण नुकतेच जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. तसेच रूग्णलयातील दंत विभाग, आकस्मिक विभाग, फिजीओथेरपी विभाग, प्रतिक्षालय, औषधी भांडार आणि सुसज्ज वस्त्र धुलाई उभारणीसाठी कामे केली आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालय हे जिल्हयातील प्रमुख व एकमेव संपुर्ण आरोग्य सेवा देणारे माध्यम आहे. याचे अधिक सोयी सुविधांनी नुतणीकरण केले जात आहे. तसेच उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयांचे बळकटीकरणही केले जात आहे.

जिल्हयात कोरोना मुळे निर्बंध लावण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राज्यभर सुरू केलेल्या अल्पदरातील शिवभोजन थाळीतून चाकरमान्यांना यावेळी मोठया प्रमाणात फायदा झाला. आता कोरोना काळात ती मोफत स्वरूपात वाटप करण्यात येत आहे. जिल्हयात शेतीमध्येही दुबार पिक पध्दत घेण्यासाठी शेतकरी पुढे येत आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड दिल्यास जिल्हयातील शेती अधिक प्रगतशील होईल. यासाठी धान शेतीबरोबर व नंतर इतर पीक पध्दती शेतकऱ्यांनी आत्मसात करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. करडई, ज्वारी, अगदी स्ट्रॉबेरी सुद्धा जिल्हयात लागवड केली जात आहे.

नक्षलवाद कमी झाला : जिल्हयात नक्षलवाद नेहमीच विकासाच्या आड येताना आपण पाहत आहे. परंतू आता जिल्ह्यात नक्षलवाद कमी होत आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. हे वर्ष गडचिरोली पोलीस दलासाठी महत्त्वाचे व यशस्वी वर्ष ठरले आहे. ग्रामपंचायत निवडणूका अतिशय शांततेत पहिल्यांदाच पार पाडल्या गेल्या. यावर्षी चकमकीत ७ नक्षली मारले गेले, ४ जणांना अटक केली तर ४ जणांनी आत्मसमर्पण केले. अशा प्रकारे विविध विकासात्मक कामातून, पोलीस प्रशासनाच्या लढ्यातून, जिल्हा प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनातून महाराष्ट्र राज्यातील हिरवाई असलेला गडचिरोली जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट : राज्यमंत्री राजेंद्र पाटिल यड्रावकर यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट देवून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी लसीकरण, रूग्णांवरील उपचार, औषधांचा पुरवठा व ऑक्सिजन पुरवठा याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, डॉ. सोळंकी, डॉ. विनोद मशाखेत्री, डॉ. बागराज दुर्वे उपस्थित होते. राज्यात असे लक्षात आले आहे की बहुतेक करून रुग्ण ग्रामीण भागात तालुकास्तरावरील खाजगी डॉक्टरांकडून उपचार घेत आहेत. मात्र या वेळी संबंधित डॉक्टरांशी संवाद साधून कोरोनाबाबत लक्षणे असल्यास रुग्णांना तातडीने चाचणी करून घेण्याचे निर्देश सर्व डॉक्टरांना द्या असे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित आरोग्य विभागाला दिले. अशा परिस्थितीत कोरोना रुग्ण उशिरा शासकीय दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करणे कठीण होते. यासाठी वेळेत उपचार करणे आवश्यक असल्याने संबंधित सर्व खाजगी डॉक्टरांना प्रत्येक रुग्णाची कोरोना बाबतची लक्षणे तपासण्यास सांगून इतर आवश्यक सूचनाही द्याव्यात अशा सूचना राज्यमंत्री यांनी या बैठकीत दिल्या.

Comments are closed.