Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO)स्थापन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 23, डिसेंबर :- राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय, मुंबई येथे स्विकारुन त्यावर कार्यवाही करण्याकरीता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र, यामध्ये अधिक लोकाभिमुखता,पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात आलेले आहे. सदर कक्षामार्फत सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने इत्यादीवर कार्यवाही करण्यात येत आहे. सदर कार्यवाहीमध्ये अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांच्या जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

जिल्ह्यामधील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ हे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय, मुंबई येथे न देता सदर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे देण्याकरीता स्वंतत्र कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. सदर कक्षामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी यांना “पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी” म्हणून नेमण्यात आलेले आहे. तरी गडचिरोली जिल्ह्यामधील सर्व नागरीकांनी मा.मुख्यमंत्री महोदयांना सादर करावयाचे जिल्ह्यामधील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ हे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय,मुंबई येथे न देता सदर अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथील स्थापन करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री सचिवालय कक्षामध्ये” देण्यात यावे,असे आवाहन समाधान शेंडगे,निवासी उपजिल्हाधिकारी तथा पदसिध्द विशेष कार्य अधिकारी (मुख्यमंत्री सचिवालय कक्ष), जिल्हाधिकारी  कार्यालय, गडचिरोली यांनी केलेले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.