Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भारतात पहिल्यांदाच एकल स्तंभ तंत्रज्ञानाद्वारे उभारले जाणार पुलाचे खांब

  • सागरी किनारा रस्त्यांतर्गत १७६ एकल स्तंभांवर उभारले जाणार पूल.
  • एकल स्तंभांची उभारणी ही अधिक पर्यावरणपूरक; सोबतच वेळेत व खर्चात बचत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २९ एप्रिल: ‘सुखाचा प्रवास, मोकळा श्वास’ असे घोषवाक्य असणारा आणि मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ व वेगवान करण्यासह प्रदूषण नियंत्रणास देखील हातभार लावणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सागरी किनारा मार्ग’ प्रकल्पाचे (Coastal Road) काम हे महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या नेतृत्त्वात अव्याहतपणे व वेगात सुरू आहे. विशेष म्हणजे ‘कोविड १९’ सारख्या साथ रोगाचे आव्हान असतानाही या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पांतर्गत तांत्रिकदृष्ट्या अनेक अत्याधुनिक व अभिनव बाबी राबविण्यात येत असून या अंतर्गत भारतात पहिल्यांदाच ‘एकल स्तंभ’ (Mono-pile Technology) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करुन सागरी किनारा मार्गाचा भाग असणा-या पुलांखाली १७६ खांबांची उभारणी केली जाणार आहे. या दृष्टीने सुरुवातीला ३ चाचणी स्तंभांची उभारणी एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करुन करण्यात येणार असून यासाठीच्या कार्यवाहीस नुकतीच सुरुवात झाली आहे. यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री युरोपातून आणण्यात आली असून, अशाप्रकारचे तंत्रज्ञान अंमलात आणण्याचा प्रत्यक्ष अनुभव असणारे परदेशातील कुशल तंत्रज्ञ देखील या कामी स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत, अशी माहिती सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे यांनी दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणा-या सागरी किनारा मार्गांतर्गत साधारणपणे ३४ मीटर रुंदीचे व सुमारे २ हजार १०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत. तर एकूण लांबी १५.६६ किलोमीटर लांबी असणारे आंतरबदल (इंटरचेंज) देखील बांधण्यात येणार आहेत. सामान्यपणे समुद्र, नदी, तलाव इत्यादींवर पुलाचे बांधकाम करताना त्याखाली असणा-या खांबांची उभारणी ‘बहुस्तंभीय’ (Group Pile) पद्धतीने केली जाते. यात प्रत्येक खांबाच्या खाली आधार देणारे साधारणतः ४ स्तंभ उभारण्यात येतात. मात्र, एकल स्तंभ (Mono-pile) पद्धतीमध्ये त्या ऐवजी खालपासून वरपर्यंत एकच भक्कम स्तंभ उभारण्यात येतो. यानुसार सागरी किनारा प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणा-या पुलांखाली १७६ स्तंभांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

परंपरागत बहुस्तंभीय पद्धतीचा वापर करुन या १७६ खांबांची उभारणी करावयाची झाल्यास प्रत्येक खांबासाठी साधारणपणे ४ आधार स्तंभ यानुसार एकूण ७०४ स्तंभांची उभारणी समुद्रतळाशी करावी लागली असती. यासाठी समुद्रतळाच्या अधिक जागेचा वापर होण्यासह खर्च व वेळ देखील अधिक लागू शकला असता. मात्र, एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करुन उभारण्यात येणारे खांब हे तळापासून वरपर्यंत एकच खांब असणार आहेत. त्यामुळे ७०४ स्तंभांऐवजी १७६ स्तभांची उभारणी केली जाणार आहे. स्तंभांची संख्या ७०४ वरुन १७६ इतकी कमी झाल्यामुळे समुद्रतळाचा कमीत-कमी वापर होणार असल्याने तुलनेने अधिक पर्यावरणपूरकता साधली जाणार आहे. तसेच स्तंभांची संख्या कमी झाल्यामुळे बांधकामाच्या वेळेत व खर्चात देखील बचत शक्य होणार आहे.

सागरी किनारा मार्ग व त्या अनुषंगाने एकल स्तंभ तंत्रज्ञानाच्या आधारे उभारण्यात येणारे खांब इत्यादी विषयीची महत्त्वाची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

• अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारण्यात येणा-या १७६ स्तंभांचा व्यास हा प्रत्येकी २.५ मीटर, ३ मीटर व ३.५ मीटर अशा ३ प्रकारच्या आकारात असणार आहे. प्रत्येक ठिकाणची गरज शास्त्रीय पद्धतीने तपासून त्या-त्या ठिकाणच्या गरजेनुसार स्तंभांचा आकार निश्चित करण्यात आला असून, त्यानुसार या स्तंभांची उभारणी केली जाणार आहे.

• भारतात पहिल्यांदाच याप्रकारच्या एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करुन पुलाची उभारणी केली जाणार असल्यामुळे हे काम अधिकाधिक सुयोग्यप्रकारे व्हावे व शास्त्रीय-वैज्ञानिक दृष्ट्याही परिपूर्ण असावे, यासाठी जगभरात ज्या ठिकाणी अशाप्रकारे पुलांची उभारणी करण्यात आली आहे, अशा पुलांचा सविस्तर अभ्यास महापालिका अभियंत्यांच्या चमुने व संबंधीत सल्लागारांनी केल्यानंतर सागरी किनारा मार्गासाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

• एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर भारतात पहिल्यांदाच होणार असल्यामुळे परदेशातील ज्या तंत्रज्ञांना या प्रकारच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे, अशा कुशल तंत्रज्ञ मंडळींना सागरी किनारा मार्गासाठी पाचारण करण्यात आले आहे. ही मंडळी आता सागरी किनारा मार्गाच्या उभारणीसाठी कार्यरत चमुचा भाग आहेत.

• एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री भारतात उपलब्ध नसल्याने ती युरोपातून आयात करण्यात आली आहे.

• एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर भारतात पहिल्यांदाच होणार असल्याने प्रत्यक्ष बांधकामापूर्वी ३ चाचणी स्तंभांचे बांधकाम करण्यात येणार आहे. हे ३ चाचणी स्तंभ अनुक्रमे २.५ मीटर, ३ मीटर, आणि ३.५ मीटर या व्यासाचे असणार आहेत. तर या स्तंभांची जमिनीखालील व जमिनीवरील एकूण उंची ही सुमारे १८ मीटर इतकी असणार आहे.

• वरीलनुसार ३ चाचणी स्तंभ उभारण्याची कार्यवाही ही नुकतीच सुरु झाली आहे. वरळी परिसरातील अब्दुल गफार खान मार्गावर असणा-या बिंदू माधव ठाकरे चौकानजिकच्या सागरी किनारा मार्गाच्या जागेत या स्तंभांची उभारणी करण्यात येणार आहे. साधारणपणे जुलै अखेरपर्यंत या स्तंभांची उभारणी पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

• एकल स्तंभ तंत्रज्ञानानुसार उभारण्यात आलेल्या चाचणी स्तंभांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या टनांचा दाब उभ्या व आडव्या पद्धतीने देण्यात येणार आहे. या चाचणीद्वारे स्तंभांची भार वहन क्षमता व धक्के सहन करण्याची क्षमता मोजली जाणार आहे.

• एकल स्तंभ तंत्रज्ञानानुसार पुलाच्या निर्धारित ठिकाणी उभारण्यात येणा-या प्रत्यक्ष स्तंभांच्या बांधकाम कार्यवाहीस पावसाळ्यानंतर म्हणजेच सप्टेंबर २०२१ नंतर सुरुवात होईल, अशीही माहिती प्रमुख अभियंता श्रीमती मराठे यांनी दिली आहे.

Comments are closed.