Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लोकसभा निवडणूक : नामनिर्देशन पत्रासोबत ना-देय प्रमाणपत्र आवश्यक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 23 मार्च – लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरतांना उमेदवारांना निवडणूक आयोगामार्फत विविध सूचना देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने मागील दहा वर्षाच्या कालावधीत कोणत्याही वेळी शासकीय निवासस्थानाचा ताबा घेतला असल्यास त्याच्या वापराचे संबंधीत विभागाचे भाडे, विद्युत आकार, पाणीपट्टी व दुरध्वनी आदी देयके भरून सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे ना-देय प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.

स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडने बंधनकारक
उमेदवारांनी लोकसभा निवडणूकीचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडावे. हे खाते उमेदवाराला स्वत:चे नावे किंवा निवडणूक प्रतिनिधीसोबत संयुक्तरित्या काढता येईल. सदर बँक खाते नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या किमान एक दिवस अगोदर उघडलेले असणे आवश्यक असून यात केवळ निवडणूकीशी संबंधीतच व्यवहार करायचे आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अपक्ष उमेदवारांना १० प्रस्तावक आवश्यक
उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करतांना याच लोकसभा मतदार संघातील प्रस्तावक असणे बंधनकारक आहे. मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारांना एक मतदार प्रस्तावक तर अपक्ष आणि इतर राज्यातील मान्यताप्राप्त अथवा नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांना 10 मतदार प्रस्तावक असावे.

12-गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असल्याने अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्राची सांक्षाकित प्रत जोडणे, अनामत रक्कम रुपये बारा हजार पाचशे रोखीने किंवा चलनाने भरणा करणे, शपथपत्रातील सर्व रकाने स्पष्ट शब्दात पूर्णपणे भरणे, सक्षम प्राधिकाऱ्या समोर शपथ घेतल्याबाबतचे शपथपत्र सादर करणे, आदी काही सूचना सोबतच भारत निवडणूक आयोगाने नामनिर्देशनाबाबत निर्गमित केलेल्या सविस्तर सूचनांचे अवलोकन उमेदवारांनी करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.