Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्रातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन, कुठे Night Curfew तर कुठे कडक निर्बंध लादण्यात आले?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. १२ मार्च: राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यू किंवा कडक निर्बंध लावले जात आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात हे निर्बंध लागू करण्यात आले आहे.

नागपूर, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, औरंगाबाद याशिवाय अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्यात येत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पुण्यात कडक निर्बंध 

पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहे. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. येत्या 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्यान एकवेळ बंद राहणार आहेत. हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत. तसेच लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पनवेलमध्ये नाईट कर्फ्यू

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 12 ते 22 मार्च या कालावधीत पनवेलमध्ये रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. या काळात शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास पूर्णपणे बंद राहतील. केवळ दहावी आणि बारावीच्या शिकवणी वर्गांना परीक्षा जवळ आल्यामुळे अपवादात्मक परवानगी देण्यात आली आहे. तसेच 22 मार्चपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात कोणताही लग्नसमारंभ आयोजित करण्यासाठी पोलिसांच्या परवानगीची गरज असेल.

नागपुरात लॉकडाऊन

नागपुराच कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरमध्ये येत्या 15 मार्चपासून ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात असणार आहे. यावेळी मद्य विक्री बंद राहील. लसीकरण सुरू राहील. अत्यावश्यक सेवा सुरू राहील. डोळ्यांचे दवाखाने आणि चष्म्याचं दुकान सुरू राहील.

कल्याण-डोंबिवलीत कठोर निर्बंध

कल्याण-डोंबिवली परिसरात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरातील दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेतच सुरु राहणार आहेत. शनिवार आणि रविवार P-1 आणि P-2 यानुसार दुकाने सुरु ठेवण्यात येतील. खाद्यपदार्थ आणि शीतपेयाच्या गाड्या रात्री 7 वाजेपर्यंतच सुरु राहतील. भाजी मंडई 50 टक्के क्षमतेनं सुरु राहील.

लग्न आणि हळदी समारंभ सकाळी 7 ते संध्याकाळी 9 या वेळेत आखून दिलेल्या मर्यादेनुसारच करण्यात यावेत. अन्यथा वर-वधू आणि हॉल मालकाविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर केडीएमसी परिसरातील बार रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहतील. होम आयसोलेशनमध्ये असणारा रुग्ण बाहेर फिरताना आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

जळगावात जनता कर्फ्यू 

जळगावात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 12 ते 14 मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. सोमवारी 15 मार्चपासून सकाळी 8 वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवेत दवाखाने आणि मेडिकल्स, शासकीय कार्यालये 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह, दूध विक्री केंद्र तसेच कृषी क्षेत्रातील आस्थापना, गॅरेज अशा बाबींना या जनता कर्फ्यूत सूट देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या बाबींना प्रशासनाकडून सूट नसून कडक निर्बंध आहेत.

जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवेतून किराणा माल, भाजीपाला व फळे विक्रीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. नागरिकांची बाजारपेठेत होणारी गर्दी रोखून कोरोनाची संपर्क साखळी तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. जनता कर्फ्यूच्या अनुषंगाने प्रशासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

अकोल्यात तीन दिवस कडकडीत लॉकडाऊन

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर आठवड्यातून दोन दिवस शनिवार आणि रविवारी कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच आदेश जारी केले आहेत. प्रत्येक आठवड्यात शनिवार आणि रविवारी संपूर्ण दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये केवळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहणार आहेत. शुक्रवार आज रात्री 8 ते सोमवार सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

वाशिममध्ये नाईट कर्फ्यू

वाशिम जिल्ह्यात 8 मार्च ते 15 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. यानुसार संध्याकाळी 5 पासून सकाळी 9 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. तर शनिवार सायंकाळी 5 ते सोमवारी सकाळी 9 पर्यंत 38 तासांची संचारबंदी लागू आहे. याच दरम्यान दूध विक्रेते, डेअरी यांना सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. तर दवाखाने,मेडिकल हे 24 चालू राहणार आहे.

नांदेडमध्ये कडक निर्बंध

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नांदेडमध्ये कडक निर्बंध लावण्यात येणार आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहे. त्यानुसार येत्या 12 मार्च रात्री 12 वाजल्यापासून ते 21 मार्च पर्यंत जिल्ह्यात रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत सर्व व्यवहार, दुकाने बंद राहतील. औषधी दुकानांना यातून सूट देण्यात आली आहे. सर्व कोचिंग क्लासेस ,आठवडी बाजार पूर्णपणे बंद राहणार आहेत. तर 15 मार्चपर्यंत लग्नाला 50 लोकांच्या उपस्थितीत परवानगी आहे

त्यानंतर 16 मार्च ते 21 मार्च पर्यंत लग्न ,राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमाना बंदी आहे. परीक्षा असल्याने शाळा – महाविद्यालय कोविड नियमानुसार सुरू राहणार आहेत. पण 21 मार्चनंतर जर रुग्ण आणखी वाढले तर निर्बंध आणखी कडक केले जाणार आहेत.

औरंगाबादची स्थिती काय?

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. वेरुळ-अजिंठा लेणीसह औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळं 4 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. दरम्यान, औरंगाबादेत मध्यरात्रीपासून अंशत: लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच बाजारपेठा सुरु राहणार आहेत. गर्दी होणारे सर्व कार्यक्रम आणि शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

Comments are closed.