Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शहीद मंगेश रामटेके यांच्यावर शासकीय इतमामात भिवापूर येथे अंत्यसंस्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क, दि. ६ मार्च: छत्तीसगडमधील कोहकामेटा परिसरातील जंगलामध्ये 5 मार्च रोजी नक्षली विरुद्ध कारवाईत शहीद झालेल्या भिवापूर येथील मंगेश हरिदास रामटेके या जवानावर आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भिवापूर येथील मरू नदीवर सायंकाळी ६ वाजता त्यांना भडाग्नी देण्यात आला. शहीद मंगेश रामटेके यांच्या पश्चात पत्नी राजश्री, सात वर्षीय मुलगा तज्ञ, वडील हरिदास रामटेके, आई विजयालक्ष्मी व लहान भाऊ दिनेश रामटेके असा परिवार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शहीद जवान मंगेश हरिदास रामटेके हे इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस ( आयटीबीपी ) सेवेत होते. कोहकामेटा परिसरात काल दिनांक 5 मार्च रोजी नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंग स्फोटात ही दुर्घटना घडली.

खासदार कृपाल तुमाने, आमदार राजू पारवे, माजी आमदार सुधीर पारवे, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय अधिकारी सावन कुमार, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, ठाणेदार महेश भोर्टेकर यांच्यासह पोलीस दल व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नक्षलवाद्यांसोबत लढतांना त्यांना वीर मरण आले आहे. भिवापूरसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये या वृत्ताने शोककळा पसरली असून ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी या दुःखद घटनेनंतर आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Comments are closed.